संपूर्ण भारत देशात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज लक्षावधी लोक या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत तर, हजारो लोकांचा यामुळे मृत्यू होतोय. वैद्यकीय साहित्याचा तुटवडा भासू लागल्याने परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्याचवेळी भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमधूनही भारताला सहकार्य मिळू लागले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेदेखील ट्विटकरून भारतीयांसाठी प्रार्थना केली. त्याच्या या कृतीबद्दल अनेकांनी त्याचे आभार मानले.
शोएबने केले असे ट्विट
क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेदेखील भारतीयांसाठी प्रार्थना केली. शोएबने ट्विट करताना लिहिले, ‘भारतातील लोकांप्रती माझ्या प्रार्थना आहेत. मला आशा आहे की परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल आणि त्यांचे सरकार ही आपदा व्यवस्थित हाताळेल. आपण सगळे सोबत आहोत.’
शोएबने यासोबत इंडिया नीड्स ऑक्सिजन, इंडिया फाइट्स कोविड१९ व वन वर्ल्ड हे हॅशटॅग देखील दिले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने देखील मागील वर्षी कोरोना रुग्णांना आपल्या ‘शाहिद आफ्रिदी फाउंडेशन’ मार्फत जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती. भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग व युवराज सिंग यांनी देखील आफ्रिदीला सहकार्य केले होते.
पाकिस्तानातून होतेय मदत
भारतातील कोविड-१९ ची दुसरी लाट भयंकर रूप घेत असताना. पाकिस्तानातून देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठी रुग्णवाहिका साखळी असलेल्या ईधी ॲम्बुलन्स सर्विस त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या पत्रानंतर पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान स्टँड विथ इंडिया’ आणि ‘प्रेयर्स फॉर इंडिया’ हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होते. पाकिस्तानी नागरिकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना भारताला मदत करावी अशी विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा ‘तो’ मजेदार किस्सा
अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ