बुधवारी(25 सप्टेंबर) आयसीसीने टी20 क्रमवारी(T20I Ranking) जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवनने(Shikhar Dhawan) प्रगती करत पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्याकडे वाटचाल केली आहे.
तसेच या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या हजरतउल्ला झझाई आणि स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीनेही मोठी झेप घेतली आहे. तर आयर्लंडच्या केविन ओब्रायन, दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेहलुक्वायो, क्विंटॉन डीकॉक(Quinton de Kock), ताब्राईज शम्सीने (Tabraiz Shamsi) टी20 क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवली आहे.
आयसीसीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेव्यतिरिक्त बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघातील तिरंगी टी20 मालिका आणि आयर्लंड, स्कॉटलँड आणि नेदरलँड्स संघातील तिरंगी टी20 मालिकेनंतर ही क्रमवारी जाहिर केली आहे.
या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट 1 स्थानाची प्रगती करत 11 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 72 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे त्याला क्रमवारीत प्रगती करण्यात मदत झाली आहे.
तसेच शिखरने 3 स्थानांची प्रगती केली आहे. त्याने 13 वे स्थान मिळवले आहे. शिखरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे 40 आणि 36 धावांची खेळी केली होती.
या क्रमवारीत रोहित शर्मानेही(Rohit Sharma) एका स्थानाची प्रगती करत 9 वे स्थान मिळवले आहे. तर या क्रमवारीत 3 स्थानांची घसरण झाल्याने केएल राहुल(KL Rahul) 10 व्या क्रमांकावर आला आहे. रोहित आणि राहुल हे दोनच भारतीय पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर अनेक दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही क्रमवारीत फायदा झाला आहे. या मालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे 52 आणि नाबाद 79 धावांची खेळी करणारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटॉन डीकॉकने फलंदाजांच्या क्रमवारीत 19 स्थानांची मोठी झेप घेत 30 वा क्रमांक मिळवला आहे.
तर गोलंदाजी क्रमवारीत फेहलुक्वायोने 2 क्रमांक पुढे जात 7 वे स्थान मिळवले आहे. फिरकी गोलंदाज शम्सीने 13 क्रमांकांची झेप घेत 20 वे स्थान मिळवले आहे.
अफगाणिस्तानच्या झझाईने कारकिर्दीतील सर्वोत्तम 727 गुण मिळवताना फलंदाजी क्रमवारीतील 5 वे स्थान कायम राखले आहे. तो अफगाणिस्तानकडून सर्वोत्तम गुण मिळणारा फलंदाजही ठरला आहे.
तसेच नेदरलँड्स विरुद्ध 56 चेंडूत 127 धावांची खेळी करणाना स्कॉटलँडचा मुन्सी हा 600 गुण मिळवणारा स्कॉटलँडचा पहिला फलंदाज ठरला आहे. पण तिरंगी मालिका संपल्यानंतर त्याचे 585 गुण झाले आहेत. त्याने या क्रमवारीत 15 स्थानांची प्रगती करत 21 वे स्थान मिळवले आहे.
याबरोबरच गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमानने पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. त्याने तब्बल 29 स्थानांची उडी घेत 9 वे स्थान मिळवले आहे.
तसेच झिम्बाब्वेचा कर्णधार हेमिल्टन मस्कद्जाने तिरंगी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने निवृत्ती घेताना टी20 क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. तो 22 व्या क्रमांकावर आला आहे.
या टी20 क्रमवारीत फलंदाजीच्या यादीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे. तर गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल अव्वल क्रमांकावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे
-अखेर टीम इंडियाच्या मदतीला धावून आला हा मोठा संघ
-एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल माजी संघसहकारी युवराज सिंग म्हणाला…