fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेने नुकतेच जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी कांस्यपदक जिंकले. त्याने  पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ली ग्राफला 11-4 अशा फरकाने पराभूत केले. राहुलने याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.

राहुलने या यशानंतर महास्पोर्टशी बोलताना अनेक प्रश्नांची दिलखूलासपणे उत्तरे दिली आहेत. या संवादातील काही भाग…

प्रश्न:- राहुल जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळविल्याबद्दल अभिनंदन. हे यश तु 61 किलो वजनी गटात मिळवले आहेस. तु नेहमी 57 किलो वजनी गटात खेळत आला आहेस. तरीही तुझा आवडता वजनी गट कोणता?

राहूल:-  मी आजपर्यंत 57 किलो वजनी गटामध्ये खेळत आलो आहे. आता शेवटच्या तीन ते चार स्पर्धा 61 किलो वजनी गटामध्ये खेळलो आहे. त्याचबरोबर 57 किलो वजनी गटामध्ये ट्रायल्समध्ये जिंकलो आहे आणि कॉमनवेल्थमध्ये पहिला आलो आहे. 61 किलो वजनी गटामध्ये इटली, तुर्की आणि आशियामधील तीन स्पर्धांमध्ये मेडल्स मिळवले आहेत. त्यामुळे 57 किलो वजनी गट असो वा 61 वजनी गट पाहुन त्याची तयारी करावी लागते आणि त्यानुसार आम्ही खेळतो.

प्रश्न:- दहा वर्षांचा अनुभव नक्कीच कमी नाही. परंतु आता हे वजनी गट बदलताना तुझ्यावर कुणाचा दबाव तर नसतो ना?

राहूल:- नाही.  हा दबावाचा भाग नसतो. माझं वजन किती आणि मी कशामध्ये चांगले योगदान देऊ शकतो यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. कोणत्या वयोगटात खेळायचे हा पुर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय असतो.

प्रश्न:- जसा तुझा अनुभव वाढत आहे तस वयदेखील वाढत आहे. तसेच 2020 ऑलिंपिकमध्ये 57 आणि 65 हे वजनी गट आहे. त्याची एकप्रकारची तयारी करण्याच्या दृष्टीने 57 किलो वजनी गटामध्ये किंवा 65 किलो वजनी गटामध्ये खेळू शकला नसता का?

राहूल:- आज सुशील कुमार, योगेश्वर दत्त सारख्य़ा खेळाडूंनी वयाची आडोतिशी पार केली आहे. पूर्वी असं असायचं की, 28 आणि 30 वयापर्यंत कुस्तीमध्ये कारकिर्द असायची. पण, मी आज इतके वर्ष झाले जागतिक स्तरावर खेळतोय आणि तुम्हीही पहाता जे पदकविजेते कुस्तीपटू आहेत ते अतिशय सिनीयर आहेत. त्यांना पाहूून आज आपली कुस्ती  वाढली आहे, उंचावली आहे. तसेच 61 किलो वजनी गटामध्ये मी तीन पदकं यापुर्वीच मिळवली आहेत. याच कारणामुळे मी 61 किलो वजनी गटामध्ये खेळतोय.

प्रश्न:- तू ऑलिंपिकचं ध्येय ठेवलं आहेस तर 57 किलो वजनी गट हा त्याची जागतिक तयारी म्हणून पाहता आले असते का?

राहूल:- हो नक्कीच. 61 किलो वजनी गट आणि 57 किलो वजनी गटात फारसा असा फरक नाही. कारण एक खेळाडू हा 61 आणि 57 किलो वजनी गटात खेळतो. पण ओल्ड चॅम्पियनशिपमध्ये पात्रता ठरवलेली असते. जो खेळाडू पात्र असतो त्याच खेळाडूला खेळायला मिळते. मला खात्री होती की मी 61किलो वजनी गटात खेळू शकेल.  कदाचित 57 किलो वजनी गटात खेळलो असतो तर त्यामध्ये माझी रॅंकिंग असते. पण मला आशा होती की 61किलो वजनी गटात मी खेळू शकेल  आणि जिंकू शकेल. म्हणून मी या वजनी गटात खेळलो.

प्रश्न:- तू आगामी कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेस?

राहूल:- पुढे कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धा तर खेळणारच आहे शिवाय फेडरेशन जसा कार्यक्रम जाहीर करेल त्याप्रमाणे स्पर्धेत सहभागी होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक

या खेळाडूंकडून भारतीय क्रिकेटपटूंना मिळते फिटनेससाठी प्रेरणा, कोहलीने केला खूलासा

You might also like