दिल्ली कॅपिटल्स म्हणजे मागच्या तीन आयपीएलची सर्वात कंसिस्टंट टीम. तिन्ही सीझनला प्ले ऑफपर्यंत जाणारी ती एकमेव टीम, पण खरंतर या टीमच नशीब बदललं दिल्ली कॅपिटल्स असं नामकरण झाल्यावरच. आधी ११ वर्ष दिल्ली फ्रॅंचाईजी खेळली दिल्ली डेअरडेविल्स नावानं. त्यात काही मोजके सीझन सोडले तर त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच बॉटम ऑफ द टेबल राहायचा. अशातही २०१२ सिझन त्यांच्यासाठी बेस्टच. हे तेच वर्ष होतं ज्या वर्षी दिल्लीला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण मॅनेजमेंटने घेतलेल्या एका निर्णयाने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळाल. काय होता तो निर्णय? आणि खरंच त्या निर्णयामुळे दिल्लीची आयपीएल ट्रॉफी हुकली का? या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
सन २०११ला दिल्लीने सेहवागसोडून सगळीच नवी टीम बांधली. मोठी नाव टीममध्ये आली पण परफॉर्मन्स फुसका. १० टीमच्या टुर्नामेंटमध्ये ते दहाव्याच नंबरला राहिले. या टीमच करायचं काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असावा, पण तरीही मॅनेजमेंटने पुढच्या सीजनसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि नवे अधिक जुने अशी बॅलेन्स टीम बांधायचा निर्णय घेतला.
मिनी ऑक्शनमध्ये माहेला जयवर्धने, आंद्रे रसेल आणि डग ब्रेसवेल त्यांना मिळाले. आणखी एक स्मार्ट मूव्ह खेळत केविन पीटरसन आणि रॉस टेलर यांना ट्रेड करत दिल्लीकर बनवले. मागच्या वर्षीचे सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, मॉर्ने मॉर्केल आणि उमेश यादव होतेच. इरफान पठाण, वरून ऍरॉन आणि स्पिनर शाहबाज नदीम स्ट्रॉंगेस्ट इलेव्हन तयार करत होते. सिझन सुरू झाल्यावर कॅप्टन सेहवाग वाघासारखा खेळत होता. ५ मॅच ५ फिफ्टी. जयवर्धने, वॉर्नर, टेलर यांच्यापैकी कोणी ना कोणीतरी प्रत्येक मॅचला उभ राहायचं. मॉर्केल-उमेश तर अक्षरश: आग ओकत होते. पर्पल कॅपच्या रेसमधे पहिल्या आणि चौथ्या नंबरला. सहा बॅटर्स, एक ऑलराऊंडर, एक स्पिनर आणि तीन पेसर याच फॉर्म्युल्यावर चालत त्यांनी लीग स्टेज संपता-संपता पाच वर्षात पहिल्यांदाच टेबल टॉप केला.
पहिला क्वालिफायर झाला आपल्या पुण्याच्या स्टेडियमवर. दिल्ली आणि केकेआर यांच्यातली ही मॅच दिल्ली १८ रनांनी हरली. तेही फक्त १६४ चेस करताना. या मॅचमध्ये बॉलर्सने आपले काम केले, पण बॅटर्स कमी पडल्याची कबुली कॅप्टन सेहवागने दिली. दिल्ली फक्त मॅचच हरली नाहीतर, त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. पूर्ण टूर्नामेंटमध्ये नंबर सातवर ऑलराऊंडरची भूमिका बजावणारा इरफान पठाण जॅक कॅलिसचा बॉल अडवताना इंजर्ड होऊन, दुसऱ्या क्वालिफायरमधून बाहेर पडला. दोन प्लेयरचे काम करत आलेला इरफान आउट झाल्याने, चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्लीचा कस लागणार हे नक्की होते.
दुसरी क्वालिफायर होती सीएसकेच्या होम ग्राऊंडवर म्हणजे चेन्नईत. चेपॉकची ते पिच म्हणजे स्पिनरसाठी स्वर्गच. दिल्लीपुढे त्या मॅचआधी दोन प्रश्न होते. नंबर एक इरफानची जागा घेणार कोण? नंबर दोन पिच स्पिन फ्रेंडली आहे मग दुसरा स्पिनर खेळणार का?इरफानची जागा घ्यायला त्याच्याकडे सक्षम पर्याय होता आंद्रे रसेल. रसेल तेव्हा इतका फेमस नव्हता पण काम असंच करायचा. इथे मात्र एक प्रॉब्लेम होता की, रसेलला संघात घेण्यासाठी एका फॉरेन प्लेयरला खाली बसवावं लागणार होतं. जयवर्धने, वॉर्नर, टेलर आणि मॉर्केल त्यांचे फर्स्ट चॉइस फॉरेनर होते. त्यांनीच दिल्लीला इथपर्यंत आणलेलं. पहिले तीन बॅटर आणि मॉर्केल एकटा बॉलर. विशेष म्हणजे मॉर्केलच्या डोक्यावर २५ विकेटसह पर्पल कॅप होती. तोच दिल्लीच्या बॉलिंगचा सेनापती.
दिल्लीला निर्णय घ्यायचा होता. त्यांनी निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय असा होता जो पाहून सारे जण शॉक झाले. या वर्च्युअल सेमी फायनलमध्ये दिल्ली मॅनेजमेंटने चक्क मॉर्केलला बसवले. तेही पूर्ण फिट असताना. त्याच्या जागी रसेल इलेव्हनमध्ये आला. दिल्ली मॅनेजमेंटच एवढ्यावर मन भरलं नाही. आतापर्यंत टीमचा बेस्ट स्पिनर असलेल्या शहाबाज नदीमलाही त्यांनी बाहेर केलं. त्याच्या जागी आला सनी गुप्ता. सनी गुप्ता हे नावही कुणाला माहीत नसेल. त्या सनीने आयपीएल क्वालिफायरमध्ये आपला डेब्यू केला.
समोर असलेल्या सीएसकेच्या बॅटर्सनी दोन बेस्ट बॉलर नसलेली ही लाईनअप अक्षरशः चावून खाल्ली. डेब्यू करणाऱ्या सनीला ३ ओव्हरमध्ये ४७ रन्स कुटले. त्याची एक ओवर टाकायला आल्यावर सेहवागला २१ रनांचा प्रसाद दिला. मुरली विजयन धमाकेदार शतक मारत टीमला पोहोचवलं २२२ पर्यंत. तो त्या सिझनचा हायेस्ट स्कोर झाला. बॅटिंगला आल्यावर बॅटिंग लाईनअपमध्येही बदल करण्याचं धाडस दिल्ली मॅनेजमेंटने केलं. खोर्याने रन्स करणारा कॅप्टन सेहवाग पहिल्यांदाच नंबर तीनवर खेळायला आला. आला आणि एक रन करून माघारी गेला. दिल्ली मॅच हरली तीही ८६ रनांनी. बस त्यानंतर दिल्ली पुढच्या सहा वर्षात एकदाही प्ले ऑफपर्यंत पोहचू शकली नाही. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सला दिल्ली कॅपिटल व्हाव लागल.
आयपीएलचे १५ सीजन झाले पण दिल्ली अजून ती ट्रॉफी उचलू शकली नाही. २५ मे २०१२ रोजी मॉर्केल आणि नदीमला बाहेर बसवण्याचा निर्णय झाला नसता, तर कदाचित, २७ मे २०१२ला आयपीएलची चमचमती ट्रॉफी सेहवाग उंचावताना दिसला असता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोणी संधी देता का संधी! ‘या’ ५ खेळाडूंना आयपीएल २०२२मध्ये बसावे लागले बाकावरच
पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?