भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये रविवार, १ जुलैला समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीकडून हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे या दिग्गज भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे.
राहुल द्रविडला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याने एका व्हीडीओच्या माध्यमातून या सन्मानाविषयी त्याच्या भावना व्यक्त केल्या.
“आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आयसीसीने माझा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्याबद्दल मी आभारी आहे. लहानपणापासून माझे क्रिकेटमधील आदर्श होते त्यांचा समावेश असलेल्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्य माझा समावेश झाल्याने मला खूप आनंद झाला आहे.” राहुल द्रविडने हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
“माझ्या क्रिकेटमधील प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी अभार मानतो. कारण या सर्वांशिवाय क्रिकेटमधील प्रवास शक्य नव्हता.” भारतीय अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड पुढे बोलताना म्हणाला.
“माझे पालक,पत्नी,मुले, मित्र तसेच मी ज्यांच्यासोबत आणि विरोधात खेळलेले सहकारी यांच्यामुळेच माझा खेळ बहरला आहे. तसेच माझ्या शालेय क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात मला लाभलेल्या प्रशिक्षकामुळे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकू शकलो.” राहुल द्रविडने हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यानंतर या शब्दात सर्वांचे आभार मानले.
रविवार, १ जुलैला डब्लिन येथे झालेल्या आयसीसीच्या कार्यक्रात राहुल द्रविड बरोबरच रिकी पॉन्टींग आणि इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू क्लॅरी टेलर यांचाही आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारतीय अ संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर गेल्यामुळे हा सन्मान स्विकारण्यास द्रविड उपस्थित राहू शकला नाही.
तब्बल दिड दशक भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा बनून धुरा वाहिलेल्या द्रविडने १३४ कसोटी सामन्यात १३,२८८ धावा केल्या आहेत. तर ३४४ एकदिवसीय सामन्यात १०,८९९ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक, कर्णधार आणि संघासाठी संकटमोचक म्हणुन भूमिका निभावलेला द्रविड निवृत्तीनंतरही भारतीय अ संघाचा प्रशिक्षक या नात्याने जवळपास २० वर्षांपासून भारतीय क्रिकेटची सेवा करतोय.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स
-टॉप 5: आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक