जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम मे महिन्यात कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने उर्वरित आयपीएल संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आयोजित करण्याचे नक्की केले होते. याबरोबर हंगामाच्या तारखा जाहीर केल्यानंतर, आता संपूर्ण वेळापत्रक लवकरच घोषित केले जाऊ शकते.
या संघांदरम्यान होणार पहिला सामना
आयपीएल २०२१ एप्रिल-मे महिन्यात खेळवली जात होती. मात्र, २९ सामन्यानंतर अनेक खेळाडू व सदस्य कोरोनाबाधित आढळल्याने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित ३१ सामने हे युएई येथील दुबई, शारजा व अबुधाबी या मैदानांवर १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल.
बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, ‘स्पर्धेला १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर आणि अंतिम सामना दुबई येथे तर, एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर शारजा येथे खेळला जाईल. स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.’
युएई येथेच टी२० विश्वचषक होणार असल्याने त्यासाठी साखळी फेरी संपल्यानंतर अबूधाबी येथील शेख झायद स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हवाली करण्यात येईल.
मागील वर्षी देखील युएईत झालेले आयोजन
युएईत आयपीएल आयोजित होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ मध्य भारतात लोकसभा निवडणुका असल्याने काही सामने युएई येथे खेळविण्यात आले होते. त्यानंतर, २०२० साली भारतात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने संपूर्ण हंगाम युएईत खेळला गेला होता. मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेचा गतविजेता आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्डच्या ‘त्या’ निर्णयाने सगळे झाले चकित, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात घडली घटना
अरेरे! भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी