बेंगलुरु | कर्नाटक संघाने विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूवर ६० धावांनी विजय मिळवत २०१९ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. कर्नाटकचे हे विजय हजारे ट्राॅफीचे चौथे विजेतेपद आहे.
कर्नाटकने या महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार मनीष पांडेचा हा निर्णय किती योग्य होता हे गोलंदाजांनी दाखवुन दिले. तामिळनाडूचा संघ निर्धारीत ५० षटकेही फलंदाजी करु शकला नाही. ते ४९.५ षटकांत २५२वर सर्वबाद झाले.
तामिळनाडूकडून सलामीवीर अभिनव मुकूंदने ८५, बाबा अपारिजतने ६६ तर विजय शंकरने ३८ धावा केल्या. तामिळनाडूचा कर्णधार दिनेश कार्तिक केवळ ११ धावांवर बाद झाला. अन्य कोणत्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही.
कर्नाटकडून या सामन्यात अभिमन्यू मिथूनने ५ विकेट्स घेतल्या. त्यात त्याच्या हॅट्रिकचाही समावेश होता. विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस होता. विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम फेरीत हॅट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.
५० षटकांत २५३ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या कर्नाटक संघाने २३ षटकांत १ बाद १४६धावाच केल्या. सलामीवीर लोकेश राहुलने ५२ आणि मयांक अगरवालने ६९ धावा केल्या. दुसरा सलामीवीर देवदत्त पड्डीकल हा केवळ ११ धावांवरच बाद झाला. २३व्या षटकात पावसाल सुरुवात झाल्यामुळे पुढे खेळ सुरु होऊ न शकल्यामुळे व्हीजेडी पद्धतीने (VJD method) कर्नाटकला ६० धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.
कर्नाटकचे हे चौथे विजेतेपद-
कर्नाटकच्या संघाने या विजेतेपदासोबत विजय हजारे ट्राॅफीचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. यापुर्वी त्यांनी २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१७-१८च्या हंगामात हे विजेतेपद जिंकले होते.
मनीष पांडे कर्णधार म्हणूनच हिटच-
भारतीय टी२० संघात बांगलादेशविरुद्ध निवड झालेल्या मनिष पांडेने या सामन्यात कर्नाटकचे नेतृत्त्व केले होते. त्याच्याच नेतृत्त्वाखाली कर्नाटकने या वर्षी सईद मुश्ताक अली स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी महाराष्ट्राला पराभूत केले होते.






