भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ७० शतकेही त्याने केली आहेत. विशेष म्हणजे विराटने यातील २८ शतके धावांचा पाठलाग करताना केली आहेत. दबावाच्या वेळी आणि धावांचा पाठलाग करताना विराटची कामगिरी आणखी बहरलेली अनेकदा पाहायला मिळाली आहे.
बरोबर ६ वर्षांपूर्वी विराटने अशीच एक शानदार खेळी केली होती. २०१६ सालच्या टी२० विश्वचषकात २७ मार्चला भारताचा सुपर १० च्या फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १६० धावा करत भारताला १६१ धावांचे आव्हान दिले होते.
पण, भारताने या धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन विकेट्स ८ षटकांच्या आतच ४९ धावांवर गमावल्या होत्या. पण नंतर विराटने चौथ्या विकेटसाठी दुखापतग्रस्त युवराज सिंगबरोबर ४५ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला होता. पण युवराजही २१ धावा करुन बाद झाला.
त्यावेळी भारताला ६ षटकात ६७ धावांची गरज होती. तेव्हा विराटची साथ द्यायला त्यावेळीचा भारताचा कर्णधार एमएस धोनी आला. त्यांनी एकेरी-दुहेरी धावांवर लक्ष देत धावफलक हलता ठेवला.
शेवटच्या ४ षटकात ४७ धावांची गरज असताना विराटने ऑस्ट्रेलियाचे जेम्स फॉकनर आणि नॅथन कुल्टर-लाईलच्या गोलंदाजीवर आक्रमण केले होते. या दोघांनी टाकलेल्या २ षटकात विराट आणि धोनीने मिळून ३५ धावा कुटल्या होत्या. यातील ३२ धावा विराटनेच काढल्या होत्या.
शेवटच्या २ षटकात भारताला २० धावांची गरज असताना विराटने कमाल करत १९ व्या षटकात नॅथन कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर ४ चौकार मारत भारताला विजयाच्या समीप आणले होते. अखेर २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
विराटने या सामन्यात दबावाची परिस्थिती हाताळताना ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर धोनीने या सामन्यात १० चेंडूत ३ चौकारांसह नाबाद १८ धावा केल्या होत्या. त्या दोघांमध्ये ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती.
#OnThisDay in 2016, Virat Kohli did this 👇 🤯 pic.twitter.com/rc5dxTDSjp
— ICC (@ICC) March 27, 2020
या टी२० विश्वचषकात नंतर भारताला उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने पराभूत केले होते. त्यामुळे भारताचे आव्हान उपांत्य सामन्यानंतर संपूष्टात आले होते. नंतर वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २८ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर
धमाकेदार खेळीनंतर सोशल मीडियावर धोनी भाऊचीच चर्चा! चाहते आनंदात