इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानचा दुसरा कसोटी सामना येथे सोमवारी (१६ ऑगस्ट) संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने इंग्लंडवर अखेरच्या दिवशी १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताच्या या शानदार विजयानंतर अनेक आजी-माजी खेळाडू संघाचे अभिनंदन करत आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार व सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
मैदानात उपस्थित होते गांगुली
सौरव गांगुली हे लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवसापासून मैदानावर हजेरी लावत होते. पाचव्या दिवशी भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर संघाचे कौतुक करताना त्यांनी ट्विट केले की, ‘भारतीय संघाने विलक्षण विजय मिळवला. सर्व खेळाडूंचे चारित्र्य व हिंमत वाखाणण्याजोगी होती. इतक्या जवळून हा विजय पाहता आला खूप आनंद होतोय.’
सध्या सौरव गांगुली हे बीसीसीआय सचिव जय शहा व बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह इंग्लंडमध्ये आहेत. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी तेथे गेल्याचे सांगण्यात येत आहे.
Fantastic win for india…what character and guts from the team ..each and every one ..such a pleasure to watch it from so close..@bcci @imVkohli @RaviShastriOfc @JayShah @ThakurArunS @ShuklaRajiv
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 16, 2021
लॉर्ड्सशी आहे खास नाते
सौरव गांगुली यांचे क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानाशी खास नाते आहे. भारतीय संघाने यजमान इंग्लंडला पराभूत करत २००२ मध्ये याच मैदानावर नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. त्या संघाचे कर्णधार असलेल्या गांगुली यांनी विजयानंतर अंगातील जर्सी भिरकावत जल्लोष केला होता. त्यानंतर, जवळपास १८ वर्षानंतर ते बीसीसीआय अध्यक्ष म्हणून या मैदानावर पोहोचले होते.
हेडिंग्लेमध्ये असेल पुढील सामना
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात खेळला गेलेला मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. यानंतर, आता मालिकेचा तिसरा सामना हेडिंग्ले ओव्हलच्या मैदानावर खेळला जाईल. भारताला सध्या मालिकेत १-० अशी आघाडी आहे आणि ते ती २-० मध्ये रूपांतरित करू इच्छितात. दुसरीकडे यजमान इंग्लंड हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. ही कसोटी २५ ऑगस्टपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ६ नायक, ज्यांनी गाजवली लॉर्ड्स कसोटी
“इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना घाबरले”, सचिन तेंडूलकरची यजमानांवर जहरी टीका






