नॉटिंघम येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे केवळ ११ चेंडूनंतर थांबविण्यात आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात भेटल्यानंतर भारतीय संघाने १५ धावांमध्ये चार प्रमुख फलंदाज गमावले. संघाचा प्रमुख खेळाडू चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याच्यावर सोशलमीडियामधून टीका होत असताना एका माजी भारतीय सलामीवीराने त्याला पाठिंबा दिला आहे.
भारतीय संघाचा डाव घसरला
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुलने ९७ धावांची सलामी दिली. मात्र, रोहित बाद झाल्यानंतर दिवसातील दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दुर्दैवीरित्या धावबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ४ बाद १२५ अशी होती.
या खेळाडूने केले पुजाराचे समर्थन
भारतीय कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. १६ चेंडू खेळून चार धावा काढत तो जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जोस बटलरच्या हाती झेल देऊन परतला. त्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. मात्र, माजी
भारतीय सलामीवीर व समालोचक आकाश चोप्राने त्याचे समर्थन केले. चोप्रा म्हणाला, “चांगल्या चेंडूवर बाद झाल्यावर निराश व्हायचे काहीच कारण नाही. तो चेंडू अप्रतिम होता. पुजाराने आपल्याच डोक्यात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.” आकाश चोप्राने विराट कोहली व जेम्स अँडरसन यांच्यातील द्वंदाविषयी देखील प्रतिक्रिया दिली.
खराब फॉर्ममध्ये आहे पुजारा
मागील ८-९ वर्षापासून भारतीय कसोटी संघाचा प्रमुख स्तंभ असलेला चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून फॉर्मशी झगडत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याचे हे अपयश प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर, अनेक चाहत्यांनी त्याला संघाबाहेर करण्याची मागणी सोशल मीडियावरून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज होण्यापासून अँडरसन एक पाऊल दूर, आज होणार भीमपराक्रम!
अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे
चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित अवघ्या ३६ धावांवर झेलबाद, मैदान सोडताना स्वत:वरच काढला राग






