भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना सुरू गवसला नव्हता. मात्र, स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीने प्रभावित केले. विशेषतः जसप्रीत बुमराह चांगली गोलंदाजी करत पुन्हा फॉर्मात आला. बुमराहने अवघ्या ३.४ षटकात १० धावा देत दोन विकेट घेत स्कॉटलंडला ८५ धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान त्याने अनेक जबरदस्त यॉर्कर बॉल देखील टाकले. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे म्हटले आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात आकाश चोप्राने बुमराहच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘जर एखाद्या खेळाडूला भारतीय संघातून काढून टाकल्यानंतर संघ अर्धवट वाटू लागला, तर तो खेळाडू रोहित शर्मा, केएल राहुल किंवा विराट कोहली नसून तो जसप्रीत बुमराह आहे. तो भारतीय संघाची विमा पॉलिसी आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात बुमराहने भारताला शानदार सुरुवात करून दिली होती. आजकाल त्याची गोष्ट अशी झाली आहे की, तो एकतर यॉर्कर टाकतो किंवा संथ गोलंदाजी करतो. तो एक जबरदस्त गोलंदाज आहे यात शंका नाही.’
भारतीय संघाने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडचा संघ अवघ्या ८५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजाने संघासाठी जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने चार षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये अवघ्या १५ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरीही चांगली झाली होती. भारतीय संघासाठी नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी हे लक्ष्य ४३ चेंडूत गाठायचे होते आणि भारतीय संघाने अवघ्या ३९ चेंडूत हे लक्ष्य गाठले. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनीही आक्रमक खेळी खेळली होती. केएल राहुलने वेगवान अर्धशतक झळकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी