इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. त्याचबरोबर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, एक वेळ अशी होती की भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर पडला होता. पण शार्दुल ठाकूरने या सामन्यातील दोन्ही डावात धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे शार्दुलचे सध्या खूप कौतुक होत आहे.
भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने देखील शार्दुलचे कौतुक केले आहे. यावर त्याने सांगितले की, तो शार्दुलच्या अशा खेळीमुळे त्याचा खूप मोठा चाहता झाला आहे.
शार्दुलने या सामन्यातील दोन्ही डावात अत्यंत सुंदर अशी खेळी करत देखणे शॉट देखील मारले होते आणि भारतीय संघ जेव्हा अडचणीत होता तेव्हा महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले. याबाबत आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला. तर मला याचा पहिला सदस्य बनायला खूप आवडेल. भारतीय संघ जेव्हा देखील अडचणीत होता. त्यावेळी शार्दुलने जबरदस्त प्रदर्शन केले.”
“तुम्ही पहिल्या डावातील त्याची अर्धशतकी खेळी पाहा किंवा दुसऱ्या डावातील त्याची ६० धावांची खेळी. यात तर त्याने रिषभ पंतला देखील पछाडले. याच सोबत त्याने ओली पोपची महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतली. यामुळे मी तर त्याचा खूप मोठा चाहता झालो आहे,” असेही चोप्रा म्हणाला.
तसेच आकाश चोप्राच्या मते, भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर याचे सर्वाधिक श्रेय शार्दुल ठाकूरला मिळायला हवे. शार्दुलने पहिल्या डावात केलेली फलंदाजी अत्यंत निर्णायक होती. यावर बोलताना चोप्रा म्हणाला, “जर भारतीय संघ कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला असता, तर निश्चितच हा सामना भारतीय संघाने गमावला असता.”
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाची खराब सुरुवात झाली होती. त्यावेळी भारतीय संघाने केवळ १९१ धावांत केल्या होत्या. याच्या उत्तरादाखल इंग्लंडने २९० धावा केल्या होत्या आणि ९९ धावांची आघाडी घेतली होती.
मात्र, भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगले पुनरागमन केले. रोहित शर्मा(१२७), चेतेश्वर पुजारा(६१), शार्दुल ठाकूर(६०), रिषभ पंत(५०), केएल राहुल(४६) आणि विराट कोहली(४४) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या. यामुळे इंग्लंड समोर ३६८ धावांचे आव्हान उभे राहिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स यांनी शतकी भागीदारीसह इंग्लंडचा चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर कोणालाही खास काही करता आले नाही. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ २१० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने १५७ धावांनी विजय मिळवला. भारताकडून दुसऱ्या डावात उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले.
महत्वाच्या बातम्या –
–“वी आर चेन्नई बॉईज”, ब्रावो-डू प्लेसिसने सीएसकेच्या आठवणीत गायले खास गाणे, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
–तीन दिग्गज फलंदाज ज्यांनी आयपीएलमध्ये अनेकदा मोठ्या खेळी केल्या, पण शतक झळकावण्यात आले अपयश
–भारतीय गोलंदाजांनी केली कमाल! तब्बल ४ फलंदाजांना क्लीन बोल्ड करत पहिल्यांदाच केला ‘असा’ पराक्रम