जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत करून विजेतेपदाचा किताब जिंकला. न्यूझीलंड संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. तर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. मात्र अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला आठ विकेट्सने पराभूत केले.
यासह न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटचे सर्वोच्च विजेतेपद पटकावले. आता क्रिकेट विश्लेषक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने एका जागतिक संघाची निवड केली आहे. जी न्यूझीलंड संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर मात देऊ शकेल. यातील विशेष बाबा म्हणजे या संघामध्ये विराट कोहलीला स्थान दिले गेले नाही.
आकाश चोप्राने आपल्या जागतिक कसोटी सामन्यात खेळणाऱ्या 11 खेळाडूंच्या संघामध्ये भारताच्या 3 खेळाडूंचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या या संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या तीन खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. इतकेच नव्हे तर आकाश चोप्राने श्रीलंका संघातील खेळाडूंना देखील या संघामध्ये स्थान दिले आहे.
‘असा’ आहे संघ
आकाश चोप्राने या जागतिक संघामध्ये सलामीवीर फलंदाजीची जबाबदारी रोहित शर्मा आणि श्रीलंका संघाच्या दिमुथ करुणारत्नेला दिले आहे. याशिवाय या संघात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात जास्त धावा बनविणारा खेळाडू मार्नस लाबुशेनचा देखील समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त फलंदाजी फळीत जो रूट, स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स यांना स्थान मिळाले आहे.
आकाश चोप्राने या संघाचे नेतृत्व रूटला दिले आहे. तर रिषभ पंतची या संघामध्ये यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. आकाश चोप्राने या संघात एकमेव फिरकीपटू म्हणून आर अश्विनची निवड केली आहे. अश्विनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. तर गोलंदाजी फळीत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड आणि इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला स्थान मिळाले आहे.
आकाश चोप्राने निवडलेला जागतिक कसोटी संघ- रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, जो रूट (कर्णधार), स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, रिषभ पंत(यष्टीरक्षक), आर अश्विन, पॅट कमिन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोश हेजलवुड.
महत्त्वाच्या बातम्या:
एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी चौदा वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू
पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक