अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सातव्या पुरुष टी२० विश्वचषकाचे आयोजन ओमान व संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे करण्यात येणार असल्याचे नक्की झाले आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ कसा असेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. माजी भारतीय सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व केएल राहुल यांच्या साथीने आणखी एक नाव सुचवले.
हे आहेत पर्याय
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सलामीवीर म्हणून कोणाला स्थान द्यायचे याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. विश्वचषक सुरू होण्यास आणखी तीन महिन्याचा कालावधी असला तरी, या काळात भारतीय संघ केवळ श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळेल. त्यानंतर, आयपीएलचा उर्वरित हंगाम युएई येथे खेळवला जाईल. सध्या भारतीय संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, शिखर धवन व केएल राहुल यांना संधी दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.
आकाश चोप्रा यांनी सुचवले हे नाव
भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हटले, “टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून रोहित शर्मासह माझी पृथ्वी शॉ याच्या नावाला पसंती असेल. तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो ज्या दिवशी खेळेल त्यादिवशी विरोधी संघाला पळता भुई थोडी होईल.” पृथ्वी सध्या भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे.
चांगल्या फॉर्ममध्ये आहे पृथ्वी
भारतीय संघाकडून दोन वर्षांपूर्वी पदार्पण केलेला पृथ्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फ्लॉप झाल्यानंतर भारतीय संघातून बाहेर फेकला गेला. देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफीत त्याने ८०० पेक्षा जास्त धावा काढून मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर आयपीएलमध्ये देखील त्याने कमाल करताना दिल्लीला प्रत्येक सामन्यात वेगवान सुरुवात दिली. श्रीलंका दौऱ्यावर त्याच्याकडून भारतीय संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –






