सचिन तेंडुलकर हे क्रिकेट जगतातील एक असे नाव आहे, ज्याची विशेष ओळख करुन देण्याची गरच नाही. 24 वर्षे क्रिकेटच्या मैदानावर घालवलेल्या या अवलियाने निवृत्तीपर्यंत अनेक मोठमोठे विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत.
एक फलंदाज म्हणून सचिनने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यामुळे ‘जगातील एक महान फलंदाज’ म्हणून सर्वजण त्याला ओळखतात. मात्र, आपल्या बॅटने धावांचा रतिब घालणाऱ्या सचिनने आपल्या फिरकीची जादू देखील अनेकवेळा दाखवून दिलेली आहे. सचिनने अनेकदा आपल्या चलाख गोलंदाजीने भारतीय संघाला सामने जिंकवून दिलेले आहेत.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही क्रिकेट प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दरम्यान त्याने अनेकदा सर्वांनी अचंबित व्हावे, अशी गोलंदाजी देखील केलेली आहे. तरिही क्रिकेट रसिकांना सचिन तेंडुलकरचे फक्त फलंदाजीचे आकडे लक्षात आहेत. गोलंदाजीतील त्याची कामगिरी म्हणावी तशी चर्चेली जात नाही.
सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 200 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. या विकेटमध्ये सचिनने प्रतिस्पर्धी संघातील अनेक दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
या लेखात आपण सचिनने घेतलेल्या ‘त्या’ खास बळींची माहिती घेणार आहोत, ज्यात सचिनने प्रतिस्पर्धी संघातील दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद केले आहे. यातील हे पाच असे फलंदाज आहेत, जे सचिनच्या गोलंदाजीपुढे जास्तवेळ तग धरु शकत नसत.
सचिन तेंडुलकरने सर्वाधिक वेळा बाद केलेले 5 दिग्गज फलंदाज…
क्रमांक – 5
- महेला जयवर्धने
क्रिकेट जगतात एक तडाखेबाज फलंदाज म्हणून नाव असलेला आणि श्रीलंका संघाचा पुर्व कर्णधार महेला जयवर्धने, हा अनेकदा सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर अडखळताना दिसला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या फिरकीवर महेला जयवर्धने याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 वेळा बाद केले आहे.
क्रमांक – 4
अर्जुन रणतुंगा
श्रीलंका संघाचे एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे तत्कालिन कर्णधार आणि एक महान फलंदाज म्हणून अर्जुन रणतुंगा यांचा नावलौकीक आहे. आपल्या अनोख्या फलंदाजीच्या कौशल्याने अर्जुन रणतुंगा हे अनेक गोलंदाजांचे आवाहन सहज परतवून लावत असत. मात्र, सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर रणतुंगा हे अनेकदा अडखळताना दिसून आले. सचिनने आपल्या गोलंदाजीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 वेळा अर्जुन रणतुंगा यांना बाद केले आहे.
क्रमांक – 3
- अँडी फ्लॉवर
झिम्बाम्ब्वे संघाचा एक दिग्गज फलंदाज म्हणून अँडी फ्लॉवर याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. खेळपट्टीवर अँडी फ्लॉवरने एकदा का आपला जम बसवला तर तो सहजासहजी तेथून हटत नसे. परंतु सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर अनेकदा अँडी फ्लॉवरची दाणादाण उ़डाली आहे. सचिनने आपल्या फिरकीच्या तालावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 4 वेळा अँडी फ्लॉवरला बाद केले आहे.
क्रमांक – 2
- ब्रायन लारा
वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज ब्रायन लारा हा सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीत समकालीन होता. हे दोघेही तसे जगातील दिग्गज फलंदाज. त्यांच्यात सातत्याने तुलना करणे क्रिकेट चाहत्यांना आवडते. मात्र, एक गोष्ट क्रिकेट रसिकांना नक्कीच माहिती नसेल. ती म्हणजे ब्रायन लारा सचिनच्या गोलंदाजीवर अनेकदा गोंधळत असे. त्यामुळेच सचिनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ब्रायन लाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 4 वेळा अडकवले आहे.
क्रमांक – 1
- इंजमाम उल हक
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि धुवांधार फलंदाजीसाठी नावजलेला इंजमाम उल हक हा सचिनचा समकालिन खेळाडू. अनेक गोलंदाजांची दमछाक करणाऱ्या इंजमामने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. फलंदाजी करताना खेळपट्टीवर दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी आवश्यक ते कौशल्ये इंजमाम उल हक कडे भरपूर होते.
इंजमाम उल हकने भारताविरुद्ध फलंदाजी करताना देखील अनेक धावा काढल्या आहेत. परंतु, भारताचा प्रमुख फलंदाज असलेला सचिन जेव्हा इंजमामला गोलंदाजी करत असे, तेव्हा मात्र इंजमामची बॅट गोंधळून जात. सचिन तेंडुलकरने पाकिस्तानच्या या दिग्गज फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 7 वेळा आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बात केले आहे.