टी-२० विश्वचषक अगदी जवळ येऊन ठेपला आहे. सर्व संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपआपल्या योजना करण्यात व्यस्त झाले आहेत. अशात ऑस्ट्रेलियाही त्यांच्या संघनिवडीबाबत योजना आखत असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघाचा कर्णधार अँरॉन फिंचने म्हटले आहे की, स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरला खराब फॉर्ममुळे सनरायझर्स हैदराबाद संघातून वगळण्यात आले असले तरीही ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान पक्के आहे. याबाबत कुठलेही प्रश्नचिन्ह नाही.
ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी (६ ऑक्टोबर) संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी टी-२० विश्वचषकात त्याच्यासोबत कोण सलामीला येईल? या प्रश्नाचे उत्तर देताना फिंच म्हणाला, ‘डेविड वॉर्नर माझ्यासोबत सलामीला येईल. तो ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याची तयारी चांगली आहे यात मला कसलीच शंका नाही.’
महत्त्वाचे म्हणजे, वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद आणि प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान आधीच गमावले होते. परंतु यूएईमध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात त्याला पुन्हा संघात समाविष्ट करण्यात आले होते. परंतु त्याने दोन्ही सामन्यांमध्ये अनुक्रमे शून्य आणि दोन धावा केल्या त्यामुळे त्याला संघातून बाहेर जावे लागले. तो गेल्या वर्षभरापासून ऑस्ट्रेलियाच्या संघातून बाहेर आहे. त्याने अलीकडील वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
फक्त वॉर्नरच नाही तर ऑस्ट्रेलिया संघात इतरही काही खेळाडू आहेत जे चांगल्या फॉर्मात नाहीत. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या काळजीत भर पडली आहे. कर्णधार फिंच स्वतः गुडघ्याच्या दुखण्यामुळे त्रस्त होता. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी दोन सराव सामने होणार आहेत, त्यात त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पण फिंचने भारत आणि न्यूझीलंडसोबत होणाऱ्या सराव सामन्यासाठी तो उपलब्ध असेल याबाबत दुजोरा दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला, ‘जेव्हा मी पहिल्यांदा शस्त्रक्रिया केली होती, तेव्हा ते दोन सराव सामने खेळण्याबाबत शंका होती. पण गेल्या काही आठवड्यांत माझी प्रकृती सुधारली आहे, त्यामुळे मी तंदुरुस्त होऊन सराव सामन्यांसाठी सज्ज असण्याची बरीच शक्यता आहे. मी सराव करण्यास सक्षम आहे. मी झपाट्याने चालणे, हळू चालणे आणि गुडघ्यावर वजन टाकणे या सर्व क्रिया सुरळीतपणे करतो आहेत. यात मला कोणतीही अडचण नाही. मी या सामन्यांसाठी सज्ज असेन.’
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात भारतासाठी ‘हे’ खेळाडू ठरतील हुकुमी एक्के, ‘मालिकावीर’ बनण्याचे आहेत प्रबळ दावेदार!
आयपीएलचा उभरता सितारा उमरानची ‘या’ मातब्बर वेगवान गोलंदाजाशी होतेय तुलना, व्हिडिओ चर्चेत
आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक