ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. फलंदाजीत त्याला चांगले प्रदर्शन करण्यात सातत्याने अपयश येत आहे. नुकत्याच न्यूझीलंड विरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही फिंचला मोठी खेळी साकारता आली नाहिये. यातील पहिल्या दोन सामन्यात त्याने अवघ्या १३ धावा काढल्या आहेत.
त्याच्या या खराब प्रदर्शनाने तो आता चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. चाहत्यांनी त्याला संघातून काढण्याची तसेच कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्याची देखील मागणी करायला सुरुवात केली आहे.
फिंचच्या पत्नीलाही होतोय त्रास
मात्र काही चाहत्यांनी फिंचवर टीका करताना आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. एका चाहत्याने चक्क ऍरॉन फिंचची पत्नी एमी फिंच हिला या प्रकरणात ओढले आहे. ऍरॉन फिंचच्या खराब प्रदर्शनाबद्दल एमी फिंचला एका चाहत्याने असभ्य भाषेचा वापर करताना शिवी दिली असून तिला ऍरॉन फिंचला टी-२० कर्णधारपद सोडायला सांगा, असे म्हंटले आहे. तसेच फिंचमुळे मी बरबाद झालो आहे, असेही या चाहत्याने म्हंटले आहे.
एमी फिंचने यावर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकारार्ह नाहीत, असे म्हंटले आहे. “माझा नवरा धावा काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारच्या टिपण्या माझ्यासाठी एका वाईट दु:स्वप्नासारख्या आहेत. मात्र सगळ्यात खराब नाहीत. याआधी देखील अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या आहेत. पण यावेळी पहिल्यांदा मला आणि माझ्या कुटुंबाला जबाबदार धरले जात आहे. याप्रकारच्या गोष्टी आम्ही सहन नाही करू शकत”, असे एमी फिंच म्हणाली.
गेल्या काही काळापासून फिंच आहे खराब फॉर्ममध्ये
दरम्यान, मागील २६ डावांचा विचार केला असता ऍरॉन फिंचने केवळ १५च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय टी-२०, आयपीएल आणि बिग बॅश लीगचाही समावेश आहे. याच कारणामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघातील त्याचे स्थान धोक्यात आले आहे. आता फिंच या परिस्थितीला कसे सामोरे जातो, आणि आपला फॉर्म परत मिळवतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मुंबईकर अय्यरचा फलंदाजीत बल्ले बल्ले! सलग २ सामन्यात झुंजार शतकं, आता इंग्लंडला पाजणार पराभवाचं पाणी
पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाची कमाल, टी-२० सामन्यात १०० बळी घेत मोडला जसप्रीत बुमराहचा विक्रम