इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खान याने दिग्गज खेळाडूंना भोपळाही न फोडता माघारी धाडल्याचे पाहायला मिळाले.
यंदा श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा रिषभ पंतच्या हातात देण्यात आली आहे. रिषभने पहिल्याच सामन्यात मोठे निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए यांसारख्या अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत संघात कोणाला स्थान द्यावे? हा मोठा प्रश्न रिषभ पंतसमोर उभा राहिला होता. दिल्ली संघात उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. तरी देखील रिषभने आवेश खानवर विश्वास दाखवला. कारण आवेश वेगवान गोलंदाज आहे. यासोबतच तो धिम्या गतीचा चेंडू टाकण्यास देखील सक्षम आहे. त्यामुळे रिषभने आवेश खानला संधी दिली होती.
आवेशने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत त्याला संघात का स्थान दिले गेले? याचे उत्तर दिले. आवेशने ४ षटक गोलंदाजी केली. यात त्याने अवघ्या २३ धावा देत २ गडी बाद केले. दुसऱ्याच षटकात त्याने आक्रमक फाफ डू प्लेसीसला पायचीत करत शून्य धावांवर माघारी धाडले होते. त्यानंतर त्याने एमएस धोनीची अवघ्या दुसऱ्याच चेंडूवर दांडी गुल केली होती. तसेच पावरप्लेच्या षटकांमध्ये त्याने गोलंदाजी करताना २ षटकात अवघ्या ११ धावा दिल्या होत्या. यासोबतच १ गडी बाद करण्यात त्याला यश आले होते.
आवेश खानला २०१७ मध्ये झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यांनतर २०१९ मध्ये दिल्ली संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु त्याला अधिकतर वेळा बाकावर बसून राहावे लागले. आवेशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६ सामने खेळले आहेत. यात त्याला १०० गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच लिस्ट ए कारकिर्दीत त्याने १६ सामने खेळले आहेत. यात त्याला १० गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आज वॉर्नर-मॉर्गनमध्ये होणार काट्याची टक्कर; ‘अशी’ असेल SRH आणि KKR ची प्लेइंग इलेव्हन?
काय सांगता! ग्लेन मॅक्सवेलला लिलावापूर्वीच देण्यात आली होती आरसीबीची कॅप; विराटचा गौप्यस्फोट
बेटे शेर हो तुम, मौज कर दी..! विजयानंतर धवनकडून शॉचे विशेष अंदाजात कौतुक, पाहा धमाल व्हिडिओ






