AB de Villiers Statement on Shubman Gill: आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्स संघाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपला युवा प्रतिभावान खेळाडू शुबमन गिल याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. खरं तर, मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला ट्रेड करत आपल्या ताफ्यात सामील केले. त्यानंतर गुजरातने गिलला कर्णधार बनवले. तसेच, आता गिलला कर्णधार बनवल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स याने मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, कदाचित गुजरात संघ व्यवस्थापनाने इथे मोठी चूक केली आहे.
डिविलियर्सचे विधान
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “यामध्ये कोणतीही शंका नाहीये की, शुबमन गिल (Shubman Gill) याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो शानदार फलंदाजही आहे. मात्र, जेव्हा संघात केन विलियम्सन (Kane Williamson) याच्यासारखे नाव पाहतो, तेव्हा मी हैराण होतो.”
पुढे बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “हे पाहा, केन विलियम्सनसारखा खेळाडू जेव्हा तुमच्याकडे आहे, तेव्हा तुम्ही कर्णधारपदाविषयी जास्त विचार करायचा नसतो. विलियम्सनने आधीही नेतृत्व केले आहे. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. गुजरातकडे इथे विलियम्सनला कर्णधार बनवण्याची संधी होती, जी फ्रँचायझीने गमावली आहे.”
‘मिस्टर 360’ (MR 360) नावाने प्रसिद्ध असलेल्या डिविलियर्सने पुढे बोलताना म्हटले की, “गुजरातचा घेतलेल्या निर्णयाचे परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात. गिलला सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी चांगली कामगिरी करायची आहे. त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळले पाहिजे होते. तसेच, अनुभव मिळवला पाहिजे होता. आपली जागा आणखी मजबूत करण्यासाठी आणखी वेळ दिला पाहिजे होता.”
डिविलियर्स म्हणाला, “सध्या गिलला शिकण्याची गरज आहे. त्याला आतापासूनच एवढी मोठी जबाबदारी दिली नव्हती पाहिजे. याचे परिणाम फ्रँचायझीला भोगावे लागू शकतात. मला वाटते की, विलियम्सनला कर्णधार बनवले पाहिजे होते. तसेही, गिलकडे आता स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी असेल. त्याने मागील हंगामात शानदार फलंदाजी केली होती आणि 800पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि तो पुढे जाऊ शकतो.”
डिविलियर्सने असेही म्हटले की, “गिल 2025मध्ये कर्णधार बनू शकत होता. तो इथून शिकू शकला असता, पण आता त्याला लवकर कर्णधार बनवले गेले आहे. आता याच नेतृत्वाच्या दबावाचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर पडला नाही पाहिजे.”
खरं तर, शुबमन गिल याने आयपीएल 2023 स्पर्धेत 17 सामन्यात खेळताना 59.33च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 4 अर्धशतकेही निघाली होती. अशात आता आयपीएल 2024 स्पर्धेविषयी बोलायचं झालं, तर स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. (AB De Villiers Big statement About shubman gill Gujarat Titans captaincy in IPL 2024 know here)
हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी