क्रिकेटविश्वातील रनमशीन म्हणून प्रचिती मिळवलेल्या विराट कोहली याने गुरुवारी (08 सप्टेंबर) नावाला साजेशी कामगिरी केली आहे. आशिया चषक 2022 मधील अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या सामन्यात त्याने खणखणीत शतक झळकावले आहे. हे विराटचे टी20 कारकिर्दीतील पहिले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक ठरले आहे. तब्बल 1020 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विराटच्या बॅटमधून शतक निघाले आहे.
या खास कामगिरीनंतर क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज आणि विराटचा जिगरी मित्र एबी डिविलियर्स (AB De Villiers) यानेही विराटच्या विलक्षण कामगिरीची दखल घेतली आहे. त्याने विराटच्या शतकी खेळीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. डिविलियर्सला एक दिवसापूर्वीच विराटच्या शतकाची (Virat Kohli’s Century) चाहूल लागली असल्याचे त्याने म्हटले आहे.
डिविलियर्सने ट्वीट करत (AB De Villiers On Virat’s Century) लिहिले आहे की, “मी जेव्हा काल विराटला बोललो, तेव्हाच मला जाणवत होते की काय तरी शिजत आहे. खूप छान खेळलास माझ्या मित्रा.”
When I spoke to him yesterday I knew something was brewing💪
Well played my friend— AB de Villiers (@ABdeVilliers17) September 8, 2022
विराटने शतकी खेळीसह विक्रमांचे रचले मनोरे
दरम्यान अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा रौद्रावतार पाहायला मिळाला. त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या खेळीसाठी त्याने 6 षटकार आणि 12 चौकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. चाहते मागच्या 2 वर्ष आणि 10 महिन्यांपासून विराटच्या षटकाची प्रतिक्षा करत होते. अखेर अफगाणिस्तानविरुद्ध त्यांची ही प्रतिक्षा संपली.
तसेच विराटने हे शतक पूर्ण करताना भारतातर्फे टी20 तील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. यापूर्वी रोहित शर्माने भारतासाठी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 118 धावा चोपलेल्या. याच वर्षी सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्ध 117 तर रोहित व केएल राहुल यांनी अनुक्रमे 111 व 110 धावा केल्या होत्या.
भारताचा मोठा विजय
दरम्यान भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील सलग 2 सामने गमावल्याने त्यांचा आशिया चषकातील प्रवास अगोदरच संपुष्टात आला होता. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारताचा शेवटचा सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराटच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने 212 धावा फलकावर लावल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 111 धावाच करू शकला. परिणामी भारताने 101 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रिय विराट… पत्रास कारण की…
याला म्हणतात क्रेझ! विराटच्या शतकानंतर कोणी हॉस्टेल तर कोणी केला रस्त्यावर जल्लोष; पाहा व्हिडिओ
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे