इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेत अनेक सामने रोमांचक होताना दिसत आहेत. तसेच आत्तापर्यंत झालेल्या ३१ सामन्यांमध्ये अनेक युवा खेळाडूंबरोबर काही दिग्गज खेळाडूंनीही आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजेच दिनेश कार्तिक. आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत असलेल्या कार्तिकने सुरुवातीपासूनच तुफान खेळ केला आहे. त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आता तर बेंगलोरचा माजी खेळाडू एबी डिविलियर्स यानेही कार्तिकने तोंडभरून कौतुक केले आहे.
कार्तिकने (Dinesh Karthik) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) बेंगलोर (RCB) संघासाठी फिनिशरची भूमिका बजावताना जवळपास २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईकरेटने धावा जमवल्या आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक करताना डिविलियर्सने म्हणाला, कार्तिक ३६० डिग्री खेळाडू आहे.
खरंतर डिविलियर्स (AB de Villiers) याला त्याच्यातील चौफेर फटकेबाजी करण्याच्या क्षमतेमुळे त्याला ‘मिस्टर ३६०’ (Mr. 360) अशा नावाने ओळखले जाते. तसेच त्याने गेली अनेकवर्षे बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघासाठी फिनिशरची भूमिका निभावली होती. त्याचमुळे सध्या कार्तिक ज्यापद्धतीने खेळतोय, त्यामुळे चाहत्यांना डिविलियर्सची आठवण होत आहे. आता खुद्द डिविलियर्सनेच त्याचे कौतुक केले आहे.
वीयूस्पोर्टबरोबर बोलताना डिविलियर्स म्हणाला, तो दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून अचंबित झाला आहे. तो म्हणाला, ‘मला नेहमीच वाटत होते की, त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याला दबावाची परिस्थिती आवडते. तो खेळपट्टीवर व्यस्त राहणारा खेळाडू आहे. त्याने गेल्या काही महिन्यात फार क्रिकेट खेळले नव्हते. त्याने गेल्यावर्षी आयपीएलच्या आधी इंग्लंडमध्ये समालोचन केले होते. त्याने देशांतर्गत क्रिकेटही फार खेळले नाही. मी विचार केला होता की, कदाचीत तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाकडे जात आहे. पण त्याने त्याच्या जिद्दीने आणि उर्जेने सर्वांनाच चकीत केले.’
‘तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याने आरसीबीसाठी आधीच २-३ सामने जिंकून दिले आहेत. असे वाटते की, तो कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मला माहित नाही, त्याने हे कसे केले, कारण त्याने फार क्रिकेट खेळलेले नाही. पण, तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो ३६० डिग्रीने खेळत आहे,’ असेही डिविलियर्स म्हणाला.
तसेच डिविलियर्स म्हणाला, ‘त्याला पाहून मला असे वाटले की मी परत जावे आणि पुन्हा क्रिकेट खेळावे. त्याच्या मुळे मला उत्साह आला. मधल्या फळीत तो दबावाखाली खेळतो आणि त्याला खूप अनुभव आहे. जर त्याने आपला फॉर्म कायम ठेवला, तर आरसीबी खूप पुढे जाण्याची चांगली शक्यता आहे.’
दिनेश कार्तिक तुफान फॉर्ममध्ये
दिनेश कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये ७ सामन्यांत २१० च्या सरासरीने आणि जवळपास २०५ च्या स्ट्राईकरेटने २१० धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो या ७ सामन्यांपैकी ६ सामन्यांत नाबाद राहिला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जेसन होल्डरने रोखलं मॅक्सवेलचं वादळ, सुपरमॅन बनत हवेत घेतला जबराट कॅच; Video पाहाच
हेच बाकी होतं!! विराटने मोडली स्वत:चीच ४ वर्षांची परंपरा, लखनऊविरुद्ध झाला ‘गोल्डन डक’
आरसीबीचा विजयरथ सुस्साट, लखनऊला १८ धावांनी लोळवले; फाफ आणि हेजलवुड विजयाचे शिल्पकार