आयपीएल २०२१ स्पर्धेतील ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु शेवटच्या षटकात एबी डिविलियर्स स्ट्राइकवर असताना देखील सनरायझर्स हैदराबाद संघाने बाजी मारत हा सामना ४ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान एबी डिविलियर्सने या डावात एक गगनचुंबी षटकार मारताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
एबी डिविलियर्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अशातच त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १ षटकार मारताच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.
एबी डिविलियर्सने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत २५० षटकार मारले आहेत. त्याने हा कारनामा १८२ सामन्यात केला आहे. तर या यादीत सर्वोच्च स्थानी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आहे. ज्याच्या नावे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. ख्रिस गेलने १४२ सामन्यात ३५७ षटकार मारले आहेत. एबी डिविलियर्सने १८२ सामन्यात ४०.०३ च्या सरासरीने ५१२५ धावा केल्या आहेत. तर ख्रिस गेलने १४२ सामन्यात ३९.७२ च्या सरासरीने ४९६५ धावा केल्या आहेत.
या यादीत एमएस धोनी आणि रोहित शर्माचा देखील समावेश आहे. रोहितने आयपीएल स्पर्धेत २२७ षटकार मारले आहेत. तर एमएस धोनीने २१८ षटकार मारले आहेत. परंतु एबी डिविलियर्सला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मोठी खेळी खेळण्यात अपयश आले आहे. त्याने या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात ०, १२, ११, ४*, २३ आणि १९* धावा केल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
३५७ षटकार – ख्रिस गेल
२५० षटकार – एबी डीविलियर्स*
२२७ षटकार – रोहित शर्मा
२१८ षटकार – एमएस धोनी
२१४ षटकार – कायरन पोलार्ड
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम षटकात मॅच विनिंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरचा डिविलियर्सविरुद्ध होता ‘हा’ प्लॅन, वाचा
चूकीला माफी नाही! कोहलीच्या लाडक्या सिराजने सोडला सोपा झेल, कर्णधाराने मैदानातच ऐकवलं