आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळख निर्माण केलेला विस्फोटक फलंदाज एबी डीविलियर्स सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी करत नाबाद ७६ धावांची खेळी केली होती. आता त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकन संघात पुनरागमन करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एबी डीविलियर्सने ताबडतोड फलंदाजी करत, अवघ्या ३४ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २० षटक अखेर २०४ धावा केल्या होत्या.
टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सामना झाल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याबाबत तो म्हणाला, “मला या गोष्टीत रस आहे. माझ्या फॉर्मबद्दल, फिटनेसबद्दल चिंता असेल तरी आम्हाला सर्वोत्कृष्ट १५ खेळाडूंची निवड करावी लागेल. आम्ही त्यानुसारच रणनिती आखणार आहोत. मी आयपीएलच्या शेवटी मार्क बाऊचरसोबत चर्चा करेल.”
एबी डीविलियर्सने टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळावे म्हणून दक्षिण आफ्रिकेतूनच नव्हे तर जगभरातून सोशल मीडियाद्वारे जोरदार मागणी केली जात आहे. डीविलियर्सने २३ मे २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच तो जगभरातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये अजूनही तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे.
माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडू मार्क बाऊचरने शुक्रवारी (१६ एप्रिल) म्हटले होते की, “आयपीएल स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी माझे डीविलियर्स सोबत बोलणे झाले होते. बातचीत आता सुरुवातीच्या टप्प्यात आहे. एबी डीविलियर्स आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की, तो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सुटला, सुटला.. हुश्श पकडला..! सर्वत्र रंगली दीपक हुडाच्या ‘सोडपकड’ कॅचची चर्चा
‘यंदा आयपीएल ट्रॉफी किंग कोहलीचं जिंकणार,’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराला आहे विश्वास
हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे; इंग्लिश दिग्गजाने व्यक्त केली चिंता