भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची सर्वजण प्रशंसा करतात. तसेच त्याच्या यॉर्करने सर्वांना वेड लावले आहे. परंतु पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझाकने त्याला ‘बेबी बॉलर’ म्हटले होते. परंतु त्यानेच आता बुमराहची प्रशंसा करण्यास सुरुवात केली आहे. रझाकच्या मते, बुमराह महान गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे.
याव्यतिरिक्त रझाकने (Abdul Razzaq) भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यावरही (Hardik Pandya) मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, पंड्याकडे खूप पैसा आल्यामुळे त्याचे जीवन आता सोपे झाले आहे.
“मला बुमराहबद्दल काही तक्रार नाही. मी फक्त त्याची तुलना मॅकग्रा, वसीम अक्रम, कर्टली एंब्रॉस आणि शोएब अख्तर यांसारख्या गोलंदाजांबरोबर करत होतो. मी येवढेच म्हटले होते की, या गोलंदाजांविरुद्ध खेळणे सर्वात कठीण होते. माझ्या या वक्तव्याला चूकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले होते,” असे बुमराहबद्दल बोलताना रझाक म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, “बुमराह जागतिक अव्वल दर्जाच्या गोलंदाजांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु याबरोबर सर्वजण सहमत असतील की, आमच्या काळात सर्वाधिक घातक वेगवान गोलंदाज होते.
“तुम्ही सध्याच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना तितके दबावात राहत नाही. एकूणच क्रिकेटसाठी हा काळ खराब आहे. जसे १०-१५ वर्षांपूर्वी जागतिक दर्जाचे खेळाडू असायचे, तसे खेळाडू आता क्रिकेटमध्ये पहायला मिळत नाही. भारताकडे सचिन तेंडुलकर, झहीर खान, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांंसारखे खेळाडू होते. मला वाटते की, अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळेच क्रिकेटचा दर्जा कमी झाला आहे,” असेही तो यावेळी म्हणाला.
रझाकने पंड्या आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या तुलनेबद्दल बोलताना म्हटले की, पंड्या आणि कपिल देव यांची तुलना होऊच शकत नाही.
रझाक म्हणाला की, “कपिल देव आणि इमरान खान चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू होते. परंतु पंड्या त्यांच्या आसपासही नाही. मी सुद्धा एक अष्टपैलू क्रिकेटपटू होतो. परंतु याचा अर्थ असा नाही की, मी स्वत:ची तुलना इमरान खानबरोबर केली पाहिजे.”
तो पुढे म्हणाला की, “पंड्या चांगला खेळाडू आहे. परंतु तो आणखी चांगला खेळाडू बनू शकतो. हे सर्व मेहनत केल्याने होते. जर तुम्ही खेळावर अधिक लक्ष दिले नाही तर ते तुमच्यापासून दूर जाईल. पंड्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी करावी लागेल. तो अनेकवेळा दुखापतग्रस्त असतो.”
“जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो, तेव्हा तुम्ही आरामात राहता. प्रत्येक खेळाडूसाठी हे समान आहे. मोहम्मद आमिरनेही खूप मेहनत करणे सोडले आणि त्याचाही फॉर्म गेला,” असेही पंड्याबद्दल बोलताना रझाक पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२०११ विश्वचषक विजयी संघातील खेळाडू म्हणतो, केएल राहुल होणार टीम इंडियाचा कर्णधार





