पुणे- खेळाडू, संयोजक आणि मार्गदर्शक अशा अनेक भूमिकेतून समोर आलेल्या पुण्यातील ग्रॅंड मास्टर अभिजित कुंटे याला जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) वतीने वरिष्ठ फिडे मार्गदर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले.
जागतिक संघटनेतून अशा प्रकारे सन्मान मिळणारा अभिजित हा ग्रॅंड मास्टर प्रविण ठिपसे यांच्यानंतरचा दुसराच खेळाडू आहे. बुद्धिबळातील त्याच्या योगदानाबद्दल गेल्याच वर्षी त्याला केंद्र सरकारच्या वतीने मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
फि़डेकडून मिळालेल्या वरिष्ठ मार्गदर्शक या उपाधीमुळे आता अभिजितला २४५० पेक्षा अधिक एलो मानांकन गुण असलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करता येणार आहे. या सन्मानासाठी खेळाडू आंतरराष्ट्रीय मास्टर किंवा ग्रॅंड मास्टर असावा लागतो, तसेच त्याचे एलो गुणांकन २४५० किंवा त्याहून अधिक असावे लागते.
एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून अभिजितने आपली ओळख यापूर्वीच निर्माण केली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकापर्यंत मजल मारली होती. विशेष म्हणजे बुद्धिबळात सांघिक पातळीवर मिळविलेले हे भारताचे पहिले पदक ठरले होते. अखेरच्या क्षणी त्या स्पर्धेतून भारताची अव्वल खेळाडू कोनेरु हम्पी हिने माघार घेतली होती. अशा वेळी या महत्वाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करणे हे अभिजितसमोरील खरे आव्हान होते. अखेरच्या क्षणी एका अननुभवी खेळाडूचा समावेश करून संघाचे पूर्ण नियोजन, रचना त्याला बदलावी लागणार होती. अभिजितने या सर्वावर कडी केली. अचूक नियोजन आणि खेळाडूंची अदलाबदली करून त्याने भारताला रौप्यपदकापर्यंत नेऊन ठेवले होते.
वैयक्तिक पातळीवर देखिल अभिजीत एक आदर्श व्यक्ती आहे. त्याने कायम आपल्या अनुभवाचा फायदा ग्रॅंड मास्टर परिमार्जन नेगी, ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी, ग्रॅंड मास्टर एन. श्रीनाथ, महिला ग्रॅंड मास्टर सौम्या स्वामीनाथन या खेळाडूंना करून दिला. यातील प्रत्येकाने कधी ना कधी भारताचे चेस ऑलिंपियाडला प्रतिनिधीत्व केले आहे आणि करत आहेत.
इंडियन ऑईलमध्ये कार्यरत असणारा ४५ वर्षीय अभिजित चार चेस ऑलिंपियाड, ३ विश्वकरंडक, ६ आशियाई पदके आणि दोन राष्ट्रकुल पदके मिळविणारा महाराष्ट्राचा पहिला ग्रॅंड मास्टर ठरला. महाराष्ट्र बुद्धिबळ लीगचा मूळ कल्पना ही त्याचीच होती. ही लीग देखिल कमालीची यशस्वी झाली.
भारतात या वर्षी ४४वी चेस ऑलिंपियाड स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला अ संघाचे प्रशिक्षकपद अभिजितकडेच सोपविण्यात आले आहे. आता या संघाने सुवर्णपदक मिळवावे हीच अपेक्षा. म्हणजे अभिजितच्याही शिरपेचात आणखी एक नवा तुरा खोवला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
मलिंगा-बुमराहलाही मागे टाकेल अशी गोलंदाजी ऍक्शन! बॉलरचा व्हिडिओ पाहून मायकल वॉनही चकित
अमित शहांनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पाहायला येणार मॅच, INdvsSA मधील दुसऱ्या टी२०ला लावणार हजेरी
वाईट झालं! खराब फॉर्मातून जात असलेल्या पृथ्वी शॉचं तुटलं हृदय, गर्लफ्रेंड प्राचीसोबत झालंय ब्रेकअप?