सध्या जारी इराणी चषक स्पर्धेमध्ये भारतीय फलंदाज अभिमन्यू ईश्वरननं शानदार शतक झळकावलं. ‘रेस्ट ऑफ इंडिया’कडून खेळताना त्यानं मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ही कामगिरी केली.
अभिमन्यू ईश्वरनचं प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे 26वं शतक आहे. या सामन्यात मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 537 धावांचा डोंगर रचला होता. प्रत्युत्तरात, ‘रेस्ट ऑफ इंडिया’ला 40 धावांवर पहिला धक्का बसला. यानंतर ईश्वरननं एका टोकाचा ताबा घेतला. त्यानं 117 चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.
ईश्वरननं कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत पहिल्या विकेटसाठी 64 चेंडूत 40 धावा जोडल्या. यानंतर त्यानं साई सुदर्शनसोबत 130 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. ईश्वरननं आपल्या खेळीत चांगल्या चेंडूंना सन्मान दिला तर खराब चेंडूंवर मोठे फटके मारले. त्यानं आपला डाव संयमानं खेळला. कर्णधार ऋतुराज गायकवाड 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर सुदर्शननं 32 धावा केल्या.
अभिमन्यू ईश्वरन देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो, जेथे त्यानं सातत्यानं धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 98 सामन्यांच्या 167 डावांमध्ये 7,300 हून अधिक धावा निघाल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 48 पेक्षा जास्त राहिली. ईश्वरननं 26 शतकं आणि 29 अर्धशतकंही ठोकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 233 धावा आहे.
अभिमन्यू हा मूळचा तामिळनाडूचा आहे. तो बंगालसाठी सलामीच्या फलंदाजाची भूमिका बजावतो. याशिवाय तो गरजेनुसार लेग ब्रेक स्पिनर म्हणूनही प्रभावी ठरू शकतो. अभिमन्यू ईश्वरननं गेल्या महिन्यात सलग दोन दुलीप ट्रॉफी सामन्यात शतकं झळकावली होती. त्यानं 116 आणि नाबाद 157 धावा केल्या होत्या. त्यानं आपल्या या शानदार कामगिरीनं भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राखीव सलामी फलंदाज म्हणून दावा ठोकला आहे. तो गेल्या वर्षी टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. मात्र तेथे त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
हेही वाचा –
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवर कडक कारवाई, आयसीसीनं लावली एका वर्षाची बंदी; कारण जाणून घ्या
न्यूझीलंडसोबत भारताचा पहिला सामना, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाडची फ्लॉप कामगिरी सुरूच, पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता