---Advertisement---

‘हिटमॅन’ रोहितची आणि दिनेश कार्तिकच्या करीयरची गाडी रुळावर आणणारा ‘अभिषेक नायर’

On: शुक्रवार, मे 20, 2022 10:00 PM
Abhishek-Nair
---Advertisement---

आयपीएल २०२२ सुरू झालीय आणि दोन नावांची वेगळी चर्चा ऐकू येतेय. एक नाव म्हणजे एमएस धोनी दुसरे नाव दिनेश कार्तिक. सोशल मीडियावर भारी चर्चा रंगतेय की बेस्ट फिनिशर कोण? तसं तर हे इंडियन क्रिकेटमधील बरच जुन पुराण आहे. पण कार्तिक असा काही भारी खेळतोय की एखाद्याची नजर लागेल. छत्तीशी पार केलेला डीके करियरच्या शेवटच्या काही दिवसात जसा खेळतोय त्याचा सार क्रेडिट देतोय अभिषेक नायरला. कार्तिकपेक्षा फक्त एखाद वर्ष मोठ्या असलेल्या नायरला हे क्रेडिट देण्याचं कारणही आहे एकदम स्पेशल.

अभिषेक नायर म्हणजे मुंबई स्कूल ऑफ क्रिकेटचा विद्यार्थी. लिस्ट संपणार नाही इतके टॅलेंटेड प्लेअर या मुंबई स्कूल ऑफ क्रिकेटमधून आले. आता मुंबई क्रिकेटच्या इतिहासात डोकावून आपला तितका काही फायदा नाही. तर याच मुंबई क्रिकेट सर्कलमध्ये २००२-०३ पासून अभिषेक नायर या नावाची चर्चा होती. डाव्या हाताने बॅटिंग आणि मिडीयम पेस बॉलिंग असं ऑलराउंड पॅकेज म्हणून त्याला २००४ ला मुंबईसाठी संधी दिली गेली. त्याने संधी साधली संघात फिक्स झाला.

काही वर्षात आयपीएलचे बिगुल वाजले. त्याला दुसरी तिसरीकडे पहायची गरज पडली नाही. मुंबई इंडियन्सनेच त्याला संधी दिली. सलग दोन सीजन त्याने मुंबईसाठी भरीव योगदान दिले. तिसऱ्या सीझनला मात्र तो फ्लॉप झाला. पुढची दोन वर्ष पंजाबसाठी आणि त्यानंतर पुण्यासाठी खेळताना त्याला आपली छाप पाडताच आली नाही. राजस्थान रॉयल्ससोबत दोन वर्ष त्याचा परफॉर्मन्स ठीकठाक राहिला. पण स्ट्राईक रेट टी२० ला आदर्श असा नव्हता. त्यामुळे २०१५ पासून अभिषेक नायर हे नाव आयपीएलमध्ये कधीच दिसले नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमधला फेमस चेहरा असलेल्या अभिषेक नायरचे इंटरनॅशनल करियर सुरू होताच संपले. पहिल्या दोन आयपीएल सीझननंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला नॅशनल कॅप मिळाली. त्याला तीन मॅचमध्ये ब्लू जर्सी घालत आली, पण त्यातील फक्त एकाच मॅचला त्याला बॅटिंग आली आणि त्याचा भोपळाही फुटला नाही. तीन ओवर बॉलिंग करतानाही अशीच अवस्था. पुढे तो कधीही टीम इंडियाच्या आसपासही गेला नाही. फर्स्ट क्लास मॅचेसचे मात्र त्याने शतक पूर्ण केले.

प्लेयर म्हणून अभिषेक नायरचे करिअर कसे राहिले? यावर मतमतांतरे असतील. पण त्याने अगदी कमी वयातच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकची करीयर सेट करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला हे देखील नाकारता येत नाही. २०११ वर्ल्डकपला रोहित शर्माची टीम इंडियात निवड होईल असे वाटत होते. पण ही गोष्ट काही साध्य होऊ शकली नाही. रोहित थोडा डिप्रेशनमध्ये गेला. फिटनेस कमी झालता. तिथे अभिषेक नायरने त्याला मदत केली. त्याच्यातील हिटमॅन जागा केला. त्याच्यासोबत सराव केला आणि रोहितला एक परिपूर्ण खेळाडू बनण्यास मदत केली. तेव्हापासून सुरू झालेला रोहित अजूनही थांबायचं नाव घेईना.

अगदी सेम गोष्ट घडली दिनेश कार्तिकसोबत. २०१७ च्या आसपास दिनेश कार्तिक बॅड पॅचमधून चाललेला. खेळाची क्वालिटी घसरलेली. तेव्हा त्याने नायरच्या घराचे दार ठोठावले. आपल्या मित्राला मदत करायला नायर एका पायावर तयार झाला. त्याने कार्तिकला मुंबईच्या पवई भागात छोटेसे घर भाड्याने घेऊन दिले. कार्तिकच्या डायटची फिटनेसची काळजी तो घेऊ लागला. त्याचा सराव स्वतः करून घ्यायचा. सहा-सात महिन्यात याचा फायदा दिसला. कार्तिकने टीम इंडियात कमबॅक केले आणि नंतर निदहास ट्रॉफीचा करिष्मा घडला.

नायरने केलेली मदत कार्तिक विसरला नाही. आपल्यासारखाच फायदा इतरांना व्हावा म्हणून केकेआरचा कॅप्टन बनताच त्याला टीमचा मेंटर बनवल. त्याने मेंटर म्हणून अशी काही क्वालिटी दिली की आता कार्तिकने केकेआर सोडली, पण केकेआर नायरला सोडेना. खेळाडूंमधील स्फुल्लिंग जागं करायला अभिषेक नायर बेस्ट आहे असं अनेक क्रिकेटपटू खुल्या दिलाने मान्य करतात. इंटरनॅशनल करिअर जसं घडायला हवं होतं तसं अभिषेक नायरच घडलं नाही. पण इंडियन क्रिकेटला रोहित शर्माच हिटमॅन रूप दाखवलं म्हणून सारेच त्याचे ऋणी राहतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=83NvRnjo4OY

वाचा –

महिला क्रिकेटविश्वात निर्विवाद सत्ता गाजवतायेत ऑस्ट्रेलियाच्या रणरागिणी

अशा तीन घटना, जेव्हा नो-बॉल ठरला भारतीय संघासाठी व्हिलन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---