सध्या भारतामध्ये आयपीएलच्या 18व्या हंगामाचा (IPL Season 18) उत्साह शिगेला पोहोचला आहे. (22 मार्च) पासून सुरू झालेल्या या टी20 लीगवर संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे. या मेगा लीगचा फायनल सामना (25 मे) रोजी खेळला जाईल. आयपीएल संपायला अजून सुमारे 1 महिना शिल्लक आहे. या टी20 लीगच्या हंगामानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यावरही चाहत्यांचे लक्ष असेल. (Indian team’s tour of England)
जूनमध्ये भारतीय संघ इंग्लंडचा दीर्घ दौरा करणार आहे. या दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे भविष्य काय असेल? इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा संघात समावेश केला जाईल का? संघात मधल्या फळीतील फलंदाजांसाठी असलेल्या स्पर्धेदरम्यान कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते? याबद्दल एक मोठी अपडेट आली आहे.
पीटीआयच्या अहवालानुसार, इंग्लंडच्या या महत्त्वाच्या दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे स्थान निश्चित मानले जात आहे. या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की जर रोहित शर्मा त्यावेळी खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल आणि भारतीय संघाचे नेतृत्वही करेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण बीसीसीआयने रोहित शर्मावरील विश्वास कायम ठेवला आहे.
इंग्लंड दौऱ्यावरील या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ निवडला जाईल. ज्यामध्ये सर्व प्रमुख खेळाडूंना संधी मिळण्याची खात्री आहे. यासाठी शुबमन गिल, केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत असे सर्व प्रमुख फलंदाज असतील. त्यामुळे गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद शमी यांची नावेही निश्चित वाटतात. तसेच, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी यांचीही जागा निश्चित झाली आहे. याशिवाय, मधल्या फळीसाठी 6 फलंदाजांमध्ये शर्यत असेल, असे अहवालात म्हटले आहे. यामध्ये करुण नायरचे नाव घेतले जात आहे. ज्याने लाल आणि पांढऱ्या दोन्ही स्वरूपात छाप पाडली आहे. त्याला इंडिया-अ संघातही संधी दिली जाईल असे मानले जाते. यासोबतच साई सुदर्शन, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल आणि श्रेयस अय्यर हे देखील शर्यतीत असतील.






