इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाचा लिलाव नुकताच पार पडला. त्यामुळे आता अनेकांना या हंगामातील सामन्यांचे वेध लागले आहेत. हा हंगाम मार्च ते मे या दरम्यान यावर्षी खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच अशीही चर्चा आहे की, या हंगामाचे वेळापत्रक पुढील आठवड्यात सर्वांसमोर येईल. त्याचबरोबर हा संपूर्ण हंगाम भारतात खेळवण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
गेले दोन वर्षे कोरोना व्हायरसच्या भीतीने आयपीएलचे सामने भारताबाहेर हलवावे लागले होते. २०२० आयपीएल हंगामाचा पूर्ण हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) झाला होता. तसेच आयपीएल २०२१ हंगामातील पहिले सत्र भारतात झाले होते. मात्र, अचानक कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने दुसरे सत्र युएईमध्ये आयोजित करण्यात आले होते.
पण, माध्यमांतील वृत्तानुसार २०२२ हंगामात बीसीसीआय कोणतीही जोखीम घेणार नाही. त्यामुळे स्पर्धेतील साखळी फेरीचे ७० सामने महाराष्ट्रात पार पडू शकतात. तसेच प्ले ऑफचे सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होऊ शकतात. त्याचबरोबर अशीही चर्चा आहे की, बीसीसीआयने आगामी हंगामासाठी सहा ठिकाणे निश्चित केले आहेत. यातील पाच ठिकाणे महाराष्ट्रातील आहेत.
आयपीएलचा हा १५ वा हंगाम २७ मार्चपासून सुरु होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बीसीसीआय या हंगामातील साखळी सामने महाराष्ट्रात घेण्याचा विचार करत आहे, कारण त्यामुळे विमान प्रवासाचा धोका टाळला जाऊ शकतो. सध्या साखळी सामने आयोजित करण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियम, पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असे पर्याय आहेत. तसेच नवी मुंबईतील जिओ स्टेडियममध्येही सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.
आयपीएल २०२२ साठी २०४ खेळाडूंवर लागली बोली
बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल २०२२ हंगामासाठीच्या लिलावात २०४ खेळाडूंवर बोली लागली आहे. तसेच त्याआधी एकूण १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंना संघात कायम केले होते. यंदाच्या आयपीएल हंगामापासून आठ जुन्या संघांसह गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
VIDEO| श्रीलंकन फलंदाजाला नडला आळस! फिंच-वेड जोडीने केले चपळाईने धावबाद
तिसरा वनडे ठरणार रेकॉर्डब्रेक! ‘या’ पाच खेळाडूंना मोठे विक्रम रचण्याची संधी
फॉर्मशी झगडत असलेल्या इशान किशनच्या मदतीला धावून आला जाफर; म्हणाला, ‘संयम ठेवा…’