ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत इंग्लंडने (England Cricket Team) केलेल्या निराशाजन प्रदर्शनानंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. आता याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नवीन नाव सुचवले आहे. वॉनची इच्छा आहे की, इंग्लंड संघाचे पुढचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) असावेत. वॉनच्या मते लँगर इंग्लंड संघात नक्कीच सुधारणा घडवतील.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असा मोठा विजय मिळवला आणि जो रुटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन करू शकला नाही. या खराब प्रदर्शनानंतर संघाचा कर्णधार जो रुट आणि प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. याच कारणास्तव सिल्वरवूड यांनी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोडली. सिल्वरवूड यांच्या मार्गदर्शनात इंग्लंडने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले. पण, कसोटी क्रिकेटमध्ये संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. अशात वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला एका नवीन प्रशिक्षकाची गरज असणार आहे.
मायकल वॉनच्या मते, जस्टिन लँगर यांना तिन्ही प्रकारच्या संघाचा प्रशिक्षक बनवले गेले पाहिजे. वॉनला असे वाटते की, लँगर यांनी ऑस्ट्रेलियाविला चांगले प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. लँगर इंग्लंड संघाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील. तत्पूर्वी सिल्वरवूडच्या मार्गदर्शनात इंग्लंडने दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
एका वृत्तपत्रात लिहिलेल्या त्यांच्या कॉलममध्ये वॉन म्हणतात की, “गॅरी कर्स्टनही एक जबरदस्त प्रशिक्षक होऊ शकतात, पण तुम्ही कोणा एका व्यक्तिचे नाव घेतले तर, ते जस्टिन लँगर असतील. ते ऍशेस जिंकले आहेत, टी२० विश्वचषक जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियात खेळण्याविषयी त्यांना सर्वकाही माहिती आहे. त्यांना इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले जावे. इंग्लंडच्या कसोटी संघाला कडक शिस्तीची गरज आहे. जो रुटला एक मजबूत प्रशिक्षक हवा आहे.”
दरम्यान, इंग्लंडने यापूर्वी २०१९ मध्ये खेलल्या गेलल्या एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले होते. परंतु त्यानंतर इंग्लंड संघाचे प्रदर्शन दिवसेंदिवस खालावताना दिसले आहे. अशात आता संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणची नियुक्ती होईल, हेदेखील पाहण्यासारखे आहे.
महत्वाच्या बातम्या –
एक दोन नव्हे, तर ७ आयपीएल संघांकडून खेळण्याचा विक्रम होऊ शकतो ‘या’ तीन भारतीयांच्या नावावर
मोईन खानच्या पोराने ४१ वर्षीय आफ्रिदीला धू धू धुतला! एकाच षटकात ठोकले ३ षटकार, पाहा व्हिडिओ