इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर दाखल झाला आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे पार पडणार आहेत. भारतीय संघ बऱ्याच काळानंतर मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटानंतर भारतात होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघ मायदेशात कसोटीमध्ये अपराजित राहिला आहे. मागील १८ वर्षांचा विचार करायचा झाल्यास केवळ दोनच असे संघ आहेत, ज्यांनी भारताला भारतात कसोटीमध्ये पराभूत केले आहे. ते दोन संघ म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने २००४ साली २-१ अशा फरकाने भारताला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. तर इंग्लंडने २०१२ साली भारत दौऱ्यात जबरदस्त खेळ करत भारताचा २-१ अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभव केला होता.
त्यानंतर मात्र कोणत्याही संघाला भारताविरुद्ध भारतात विजय मिळवता आलेला नाही. विशेष म्हणजे भारताला भारतात पराभूत करणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळलेल्या खेळाडूंपैकी केवळ ३ खेळाडू आहेत, जे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. हे तिन्ही क्रिकेटपटू इंग्लंडचे आहेत. इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार जो रुट, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे ते तीन खेळाडू आहेत.
रुट, अँडरसन आणि ब्रॉड या तिघांचाही २०१२ सालच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघात समावेश होता. विशेष म्हणजे जो रुटने याच मालिकेतून कसोटी पदार्पण केले होते. त्याने नागपूरला झालेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच रुटने प्रभावी कामगिरी करताना पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात नाबाद २० धावांची खेळी केली होती.
या तिघांव्यतिरिक्त भारताला भारतात कसोटी मालिकेत पराभूत करणाऱ्या संघाकडून खेळलेले अन्य कोणतेही खेळाडू सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
जाळ अन् धूर सोबतच! टी१० लीगमध्ये अवघ्या २६ चेंडूत फलंदाजाने चोपल्या ८९ धावा अन् खेचले १२ षटकार
बापरे! आर अश्विनची पत्नी प्रितीने दिली होती नेहराजींना शिवी? स्क्रीनशॉट होतोय व्हायरल
ही कसली भानगड! २८ वर्षांचा दीपक चाहर झाला थेट ४८ वर्षांचा, बहिणीने केलं ट्रोल