---Advertisement---

MPL 2025 च्या मैदानात उतरला मराठी सिनेसृष्टीचा ‘संंग्राम’, क्रिकेट खेळण्याचाही लुटला आनंद

On: शुक्रवार, जून 6, 2025 5:23 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची संकल्पना असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम दणक्यात सुरू झाला. पहिल्या दोन दिवशी चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळाले. एमपीएलची ही भुरळ चित्रपटसृष्टीला देखील पडलेली दिसते. प्रसिद्ध मराठी व बॉलीवूड अभिनेता शरद केळकर याने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर हजेरी लावत स्पर्धेचा आनंद घेतला.

एमपीएल 2025 च्या दुसऱ्या दिवशी रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स असा सामना खेळला गेला. या सामन्यात रायगडने मोठा विजय मिळवत सुरुवात केली. स्पर्धेत प्रथमच खेळत असलेला सातारा वॉरियर्स संघाला पाठिंबा मात्र जोरदार दिसला. सातारा वॉरियर्स संघाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता शरद केळकर हा स्टेडियममध्ये पोहोचला होता. सामना सुरू होण्याआधी त्याने सातारा वॉरियर्स संघातील खेळाडूंची भेट घेतली. त्यानंतर त्याने एमसीए पदाधिकाऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील लुटला. त्याने फलंदाजीत अनेक तंत्रशुद्ध फटके मारले. तसेच दोन्ही संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देत त्याने स्टॅन्डमधून संपूर्ण सामना पाहिला.

शरद केळकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या, लय भारी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यातील संग्राम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. तसेच, जगप्रसिद्ध बाहुबली चित्रपटात प्रभास याला हिंदी डबिंगमध्ये शरद केळकर यांनीच आवाज दिलेला दिसतो. याव्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपट व टेलिव्हिजन मालिकांमध्ये केळकर यांनी अभिनय केलेला आहे.

या सामन्यात रायगड रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. कर्णधार ऋषभ राठोड व ऋग्वेद मोरे यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर संघाने 190 धावा उभारल्या होत्या. कर्णधार राठोड याने सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना सातारा संघासाठी कोणताही खेळाडू अर्धशतक झळकावू शकला नाही. रायगडच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे त्यांना 24 धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सातारा संघाची स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---