भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (५ मार्च) दुसरा दिवस होता. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात रिषभ पंतने शतक झळकावले. हे शतक त्याच्या कारकिर्दीतील केवळ तिसरे शतक आहे. मात्र, या शतकासोबतच रिषभने दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टच्या एका विक्रमाची बरोबरी केली.
रिषभने ठोकले तिसरे शतक
अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, रिषभने आपल्या कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. रिषभने ११८ चेंडूंचा सामना करताना १०१ धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामध्ये १३ चौकार व २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याचे हे मायदेशातील पहिलेच शतक आहे. रिषभने आपली पहिली दोन कसोटी शतके भारताबाहेर म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ठोकली होती.
गिलख्रिस्टच्या कामगिरीची केली बरोबरी
पंतने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात षटकार खेचत शतक पूर्ण केले. त्याचबरोबर रिषभने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतात कसोटी शतके ठोकण्याची कामगिरी करून दाखवली. यापूर्वी, यष्टीरक्षक म्हणून या तीन देशात शतके झळकावण्याची कामगिरी केवळ ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने केली होती. त्यानंतर, पंतने हा खास कारनामा करून दाखवला.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ठोकली होती शतके
आपला विसावा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक इंग्लंडमध्ये ठोकले होते. २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल कसोटीत त्याने ही कामगिरी केली होती. २०१९ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सिडनी कसोटीत त्याने आपले दुसरे शतक झळकावलेले. त्यानंतर तो तीन वेळा ‘नर्वस नाईन्टीज’ चा शिकार (नव्वदीत बाद) झाला आहे.
पंतच्या शतकाने भारत सुस्थितीत
रिषभ पंतने झळकावलेल्या शतकामुळे भारत अहमदाबाद कसोटीत सुस्थितीत आला आहे. भारताचे प्रमुख सहा फलंदाज बाद झाल्यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत सातव्या गड्यासाठी त्याने ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने ७ बाद २९४ धावा केल्या असून भारताकडे ८९ धावांची आघाडी आहे. तसेच भारताचे तीन फलंदाज बाद होणे बाकी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘IPLचा हिशोब कसोटीत पूर्ण करतायत,’ रोहितला बाद देणं पंचांना पडलं महागात; झाले ट्रोल
अबब! कसोटीत सहाशे विकेट घेणाऱ्या दिग्गज अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणारा पंत पहिलाच, पाहा व्हिडीओ
द्रविडच्या ‘त्या’ क्लबमध्ये सामील झाला रहाणे, सेहवागला पछाडत गेला पुढे






