पुणे- अदानी आणि जीएमआर समूह या देशातील प्रमुख उद्योगसमूहांनी अनुक्रमे गुजरात व तेलंगणा संघांची खरेदी केल्यामुळे अल्टिमेट खो खो लीग स्पर्धेला मोठेच पाठबळ मिळाले आहे. भारतातच जन्माला आलेला आणि वाढलेल्या खो खो या खेळाच्या नव्या लीगला 2022 मध्येच प्रारंभ होण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
डाबर समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन यांच्या पुढाकाराने आणि भारतीय खो खो संघटनेच्या सहकार्याने अस्सल देशी मातीत जन्मलेल्या खो खो या वेगवान खेळाचा नव्या युगाला साजेसा नवा आधुनिक आणि व्यावसायिक अवतार सर्वांच्या घराघरात पाहायला मिळावा, याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
अल्टिमेट खो खो लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिंग नियोगी यावेळी म्हणाले की, अल्टिमेट खो खोच्या रूपाने या प्राचीन खेळाचा नवा अवतार सर्वांसमोर आणून त्याची लोकप्रिंयता वाढविण्यासाठी आमच्या प्रयत्नात नव्याने सामील होणार्या अदानी आणि जीएमआर या उद्योगसमूहांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या प्रायोजकांचे पाठबळ आमच्यासाठी बहुमोल ठरणार आहे. खो खोला नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अदानी स्पोर्टसलाईन या अदानी समूहाच्या विभागाने याआधी अनेक क्रीडासमूहांना पाठिंबा दिला असून त्याद्वारे नवनव्या रूपात दर्जेदार खेळाडू आणि नवे स्टार घडविण्यासाठी व देशातील युवकांना प्रेरणा देण्याकरिता त्यांचा प्रयत्न आहे, असे सांगून अदानी स्पोर्टसलाईनचे संचालक प्रणव अदानी म्हणाले, की आणखी एका अस्सल देशी खेळाला पाठिंबा देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कबड्डी आणि मुष्टियुद्ध या खेळांमधील आमच्या सहभागामुळे खो खो या नव्या देशी क्रीडाप्रकारालाही लोकप्रियता मिळवून देण्याचा विश्वास आम्हाला वाटला. गुणवान खेळाडू शोधून काढून त्यांना पुढे आणणे, भारतात नव्याने क्रीडासंस्कृती विकसित करणे आणि त्याद्वारे भारताला जागतिक क्रीडाक्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवून देणे हेच आमचे लक्ष्य आहे.
दरम्यान क्रिकेट आणि कबड्डी यांच्या माध्यमातून जीएमआर समूहाने याआधीच क्रीडाक्षेत्रात पदार्पण केले आहे. आता खो खोच्या रूपाने नव्या देशी खेळाला पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून जीएमआर समूहाचे कॉर्पोरेट चेअरमन किरणकुमार ग्रांधी म्हणाले, की तेलंगणा संघाची खरेदी करून दक्षिण भारतातही खो खोची लोकप्रियता उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सुमारे 15 वर्षांपूर्वी कंपनीची स्थापना केल्यापासून क्रिकेट आणि मुष्टियुद्धासह कुस्तीसारख्या खेळातूनही क्रीडाक्षेत्राशी असलेली बांधिलकी सिद्ध करण्याचा जीएमआर समूहाने प्रयत्न केल्याचे सांगून श्री. ग्रांधी म्हणाले, की तळागाळाच्या स्तरावरील गुणवान खेळाडू टिपून त्यांच्यासाठी आधुनिक क्रीडा प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्याचा आमचा मानस आहे.
अल्टिमेट खो खो लीगने आपले अधिकृत प्रक्षेपण हक्क याआधीच सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांना दिले असून तेच त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत. त्यामुळे अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे सोनी समूहाच्या सर्व क्रीडा वाहिन्या, तसेच सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तुरुंगवासात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंची बिघडली तब्येत, रुग्णालयात करण्यात आले भरती
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?