इंडियन प्रिमियर लीगच्या शेवटच्या मोसमातील पंचांच्या चुका पाहता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामापासून प्रत्येक सामन्यात अतिरिक्त टीव्ही पंच नेमला जाऊ शकतो, जो विशेषत: नो बॉलवर नजर ठेवेल.
मंगळवारी बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा झाली.
याबद्दल कौन्सिलच्या एका सदस्याने सांगितले की सामन्यात कमी चुका व्हायला हव्यात यासाठी हा नियम लागू करण्यात येईल. प्रत्येक सामन्यासाठी एक विशेष पंच नेमला जाईल जो मैदानातील पंचांसोबत आणि तिसऱ्या पंचांसोबत मिळून काम करेल.
यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होईल. आयपीयलमध्ये या नियमाचा उपयोग करण्यापूर्वी हा नियम देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत वापरण्यात येईल.
मागच्या मोसमात पंचांकडून नो बॉल बाबत भरपूर चुका झाल्या आणि बर्याच खेळाडूंनी याबदद्दल प्रश्न उपस्थित केले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळलेल्या सामन्यात लसिथ मलिंगाच्या नो बॉलवरुन बरेच वाद झाले.
या सामन्यात पंचांनी मलिंगाच्या शेवटच्या बॉलला नो बॉल असतानाही तो नो बॉल दिला नव्हता. रिप्लेमध्ये हे स्पष्ट दिसत होते की चेंडू नो बॉल होता. त्यानंतर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने यावर आक्षेप घेत सांगितले की आम्ही क्लब स्तरीय सामना खेळत नाही. या व्यतिरिक्तही अनेक सामन्यांमध्ये पंचांकडून चुका झाल्या.






