संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली. सुपर १२ फेरीच्या पहिल्या दिवशीचा दुसरा सामना गतविजेत्या वेस्ट इंडीज व गत उपविजेत्या इंग्लंड यांच्या दरम्यान झाला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर पाच गडी गमावत हे आव्हान पूर्ण केले. या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद याने एक शानदार स्पेल टाकत टी२० विश्वचषकातील एक मोठा विक्रम आपल्या नावे जमा केला.
रशीदचा विक्रमी स्पेल
ख्रिस वोक्स व मोईन अली यांनी सुरुवातीला वेस्ट इंडीजला धक्के दिल्यानंतर आदिल रशीदने वेस्ट इंडीजची वाताहत केली. त्याने फक्त २.२ षटके गोलंदाजी करताना केवळ दोन धावा देत चार गडी बाद केले. यामध्ये आंद्रे रसेल (शून्य) व कर्णधार कायरन पोलार्ड (सहा) असे मोठे गडी सामील होते. त्याने वेस्ट इंडीजचे अखेरचे फलंदाज ओबेद मेकॉय व रवी रामपॉल यांनादेखील तंबूचा रस्ता दाखवला.
रशीदने दोन धावा देऊन चार गडी बाद करताना विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल टाकला. यापूर्वी श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू रंगना हेराथ याने २०१४ टी२० विश्वचषकात केवळ तीन धावा देऊन पाच गडी बाद केले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल याने २००९ विश्वचषकात ६ धावा देऊन पाच, २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्के गिलेस्पी याने ७ धावा देऊन चार तर श्रीलंकेच्या अजंता मेंडिस याने २०१२ विश्वचषकात आठ धावा देऊन सहा गड्यांना तंबूत धाडलेले.
इंग्लंडची शानदार कामगिरी
इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाने बळी मिळवताना वेस्ट इंडीजच्या तगड्या फलंदाजी क्रमाला खिळखिळे केले. इंग्लंडसाठी टायमल मिल्स व मोईन अलीने दोन, वोक्स व जॉर्डन यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. तर फिरकीपटू आदिल रशीदने चार बळी मिळवले. या सर्वांनी मिळून वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आणला. हे आव्हान इंग्लंडने ५ गडी गमावत पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
वन अँड ओन्ली बॉस…! मातब्बर फलंदाज गेलची क्षेत्ररक्षणात खास ‘सेंचूरी’, इंग्लंडविरुद्ध केला पराक्रम
फेन्सिंगला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काम करणार- पालकमंत्री सतेज पाटील