2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध 200 धावांची ऐतिहासिक खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. आता 2024 टी20 विश्वचषकात तो पुन्हा याची पुनरावृत्ती करण्याच्या उंबरठ्यावर होता, मात्र यावेळी आडवा आला गुलबदिन नायब! नायबनं मोक्याच्या क्षणी मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. मॅक्सवेलनं 41 चेंडूत 59 धावांची खेळी खेळली, ज्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र यावेळी तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुलबदिननं या सामन्यात 4 विकेट घेतल्या, ज्यामुळे सामन्याचं चित्रच पालटलं.
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीला नवीन उल हकनं पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला बाद करून अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर नवीननं तिसऱ्या षटकात मिचेल मार्शला बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणलं. या सामन्यात अफगाण गोलंदाजांनी अशी कामगिरी केली, जी अनेक वर्षे सर्वांच्या लक्षात राहील. अफगाणिस्तानसाठी नवीननं 3, गुलबदिननं 4 तर मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर आव्हान उभं केलं. या दोघांच्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार ठरला. यानंतर इतर कोणताही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं विश्वचषकातील सलग दुसरी हॅट्ट्रिक घेतली. मात्र अफगाणिस्तानच्या कामगिरीपुढे ती फिकी ठरली. भविष्यात जेव्हाही या सामन्याबद्दल बोललं जाईल, तेव्हा कमिन्सच्या हॅट्ट्रिक पेक्षा अफगाणिस्तानच्या विजयाचीच चर्चा जास्त असेल!
अफगाणिस्तानच्या या विजयानं आता ऑस्ट्रेलियासाठी सेमीफायनलचं समीकरण बिघडलं आहे. ‘अ’ गटात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक विजयासह बरोबरीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना भारताशी तर अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशशी खेळणार आहे. आता जर ऑस्ट्रेलिया भारताकडून हरला आणि अफगाणिस्तान बांगलादेशविरुद्ध जिंकला तर अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल. त्याचवेळी जर भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला आणि बांगलादेशनं अफगाणिस्तानला पराभूत केले तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचेल.
जर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियन दोघांनी आपला शेवटचा सामना गमावला, तर रनरेटचं महत्त्व वाढेल. अशा स्थितीत ज्या संघाचा रनरेट जास्त असेल, तो उपांत्य फेरीत पोहोचेल.
ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे भारताचंही नुकसान होऊ शकतं. भारत पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हरला तर भारताचे 4 गुण होतील आणि ऑस्ट्रेलियाचेही 4 गुण होतील. दुसरीकडे, अफगाणिस्ताननं बांगलादेशविरुद्धचा पुढील सामना जिंकल्यास तिन्ही संघांचे गुण 4-4 गुण होतील. अशा परिस्थितीत ज्या संघाचा रनरेट चांगला असेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्ताननं घेतला मागील पराभवाचा बदला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर
आता वर्ल्ड कप आपलाच! हे आहेत भारताच्या बांगलादेशवरील दणदणीत विजयाचे 5 नायक
पॅट कमिन्सची सलग दुसरी हॅट्ट्रिक! टी20 विश्वचषकात घडला नवा इतिहास