विराट कोहलीची गणना जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. त्यानं आपल्या कारकिर्दीत असंख्य विक्रम केले आहेत, ज्यापैकी काही मोडणे खूपच कठीण आहे. प्रत्येक कर्णधाराला आपल्या संघात कोहलीसारखा फलंदाज हवा असतो. आता अशी इच्छा अफगाणिस्तानचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीनं व्यक्त केली आहे. हशमतुल्लाहनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं असून आकडेवारी कोहलीची उत्कृष्ट कामगिरी दाखवते, असं तो म्हणाला.
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर हशमतुल्ला शाहिदी यानं विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. यादरम्यान त्याला विचारण्यात आलं की, जर त्याला भारतीय संघातून अफगाणिस्तान संघात एखाद्या खेळाडूला आणण्याची संधी मिळाली असती तर त्यानं कोणाला आणलं असतं? यावर उत्तर देताना हशमतुल्लानं विराट कोहलीचं नाव घेतलं.
हशमतुल्लाह म्हणाला, “असे अनेक खेळाडू आहेत. पण मी विराट कोहलीसोबत जाईन. त्याची आकडेवारी, त्याची कामगिरी बघा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची 50 शतकं आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे. हे सांगणं खूप सोपं आहे, पण पन्नास वेळा 100 धावा काढणं मोठी गोष्ट असते. विराट कोहलीचे आकडे त्याची कामगिरी सांगतात.”
गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तान संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत असून त्यांनी अनेक मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. अफगाणिस्ताननं अलीकडेच यूएईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. विशेष म्हणजे, ही या दोन संघांमधील पहिली द्विपक्षीय मालिका होती. त्यापूर्वी अफगाणिस्ताननं 2024 टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या संघाला पराभूत केलं होतं. या कामगिरीनंतर अफगाण संघानं त्यांना हलक्यात घेऊ नका आणि संधी दिल्यास मोठ्या संघांनाही हरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा संदेश दिला आहे.
हेही वाचा –
कोहली की रूट? सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण मोडू शकतो; माजी क्रिकेटपटू स्पष्टचं म्हणाला….
7 षटकार, 86 चौकार अन् 498 धावा! गुजरातच्या खेळाडूचा बॅटनं कहर
रणजी ट्रॉफी 2024-25; विराट कोहलीचे 5 वर्षात प्रथमच दिल्लीच्या संभाव्य संघात नाव!






