अफगाणिस्तानचा संघ सप्टेंबरमध्ये भारतात न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर खेळला जाईल. न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तानचा हा पहिलाच कसोटी सामना असेल. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अश्रफ यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.
अश्रफ यांनी एका निवेदनात म्हटलं की, “आमच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच न्यूझीलंडच्या सर्वोत्तम कसोटी संघाचं यजमानपद भूषवताना आम्हाला आनंद होत आहे. आयसीसी बोर्डाच्या विविध बैठकींमध्ये आम्ही अनेक बोर्डांसोबत अनेक चर्चा आणि मीटिंगद्वारे केलेल्या कठोर परिश्रमाचा हा पुरावा आहे. ब्लॅककॅप्स सर्व फॉरमॅटमधील जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे आणि आम्ही भविष्यात व्हाईट-बॉल द्विपक्षीय सामन्यांसाठी न्यूझीलंड क्रिकेटशी करार करण्यास उत्सुक आहोत.”
आयसीसीच्या अहवालात असं म्हटलं आहे की, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 मध्ये अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला मोठ्या फरकानं पराभूत केल्यानंतर या दोन संघांमधील हा पहिला सामना असेल. 2017 मध्ये कसोटी दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानचा हा 10वा कसोटी सामना आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध संघाचा पहिला कसोटी सामना असेल. दरम्यान, न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबरमध्ये भारतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकाही खेळणार आहे.
अफगाणिस्ताननं आतापर्यंत नऊ कसोटी सामन्यांमध्ये तीन विजय नोंदवले आहेत. संघानं आयर्लंड (2019), बांगलादेश (2019) आणि झिम्बाब्वे (2021) या संघांना पराभूत केलं आहे. अफगाणिस्ताननं आपला पहिला कसोटी सामना 2018 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. त्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं एक डाव आणि 262 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
हेही वाचा –
कसोटीमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारे टॉप 3 खेळाडू, पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज
स्टार खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे! वेस्ट इंडिजसाठी खेळणार टी20 विश्वचषक
सूर्यकुमार यादवला ‘SKY’ बनवणारा खेळाडू कोण? सूर्यानं केला मोठा खुलासा!