भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका नुकतीच पार पडली असून यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताला २-१ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (१९ जानेवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतून विराट पुन्हा एकदा केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे.
विराट भारताच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार
विराटने १५ जानेवारी रोजी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच त्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये तो भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून देखील पायउतार झाला होता. त्यानंतर मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नकोत, म्हणून निवड समीतीने विराटला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताच्या वनडे कर्णधारपदावरून काढले होते. त्यामुळे आता विराट तिन्ही क्रिकेट प्रकाराच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला असल्याने यापुढे केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसेल.
तब्बल ५ वर्षांनी वनडेत खेळाडू म्हणून खेळणार
विराटसाठी वनडे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी पहिलीच वनडे मालिका असणार आहे. त्यामुळे तो जवळपास ५ वर्षांनी म्हणजेच तब्बल १९०७ दिवसांनी केवळ खेळाडू म्हणून भारताच्या वनडे संघात खेळताना दिसेल. यापूर्वी तो अखेरचा २९ ऑक्टोबर २०१६ रोजी न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्ट्णम येथे भारताकडून खेळाडू म्हणून वनडे सामना खेळला होता. त्यानंतर तो बुधवारी पहिल्यांदाच वनडेत केवळ फलंदाजाच्या भूमीकेत दिसणार आहे.
अधिक वाचा – कॅप्टन्स इनिंग! विराटने कसोटी कर्णधार असताना केलेल्या ‘या’ ५ खेळी विसरणे अशक्यच
कर्णधार नसताना विराटची कामगिरी
विराटने आत्तापर्यंत २५४ वनडे सामने खेळले आहेत. यातील ९५ सामने त्याने कर्णधार म्हणून खेळले आहेत, तर १५९ सामने त्याने केवळ खेळाडू म्हणून खेळले आहेत. त्याने केवळ खेळाडू म्हणून खेळताना ५१.२९ च्या सरासरीने ६७२० धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने २२ शतके आणि ३५ अर्धशतके केली आहेत. तसेच १८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटची दमदार कामगिरी
विराटची दक्षिण आफ्रिकेत दमदार कामगिरी राहिली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत वनडेमध्ये १७ सामन्यांत ८७.७० च्या सरासरीने ८७७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट वनडे मालिकेत मालिकावीर ठरला होता. त्यावेळी त्याने ६ सामन्यांत ५५८ धावा केल्या होत्या.
व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?
अशी होणार वनडे मालिका
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना १९ जानेवारी रोजी पार्ल येथे होणार असून याच ठिकाणी २१ जानेवारीला दुसरा वनडे सामना पार पडेल. त्यानंतर केपटाऊन येथे तिसरा आणि अखेरचा वनडे सामना २३ जानेवारीला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर की ऋतुराज गायकवाड? कोणाला मिळणार पहिल्या वनडेसाठी टीम इंडियात संधी
केवळ ३ विकेट्स अन् चहल ‘या’ खास शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार मोठा विक्रम