विश्वचषक 2023 मधील आपला सलग दुसरा सामना भारताने बुधवारी (11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला. उभय संघांतील या सामन्यात भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सर्वाधिक 131 धावांची खेळी केली. या अप्रतिम प्रदर्शनासाठी रोहितला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. विजयानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्याविषयी खास प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाने विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध, तर दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला. भारताला विश्वचषक 2023 मधील आपला तिसरा सामना बलाढ्य पाकिस्तान संघाविरुद्ध शनिवारी (14 ऑक्टोबर) खेळायचा आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर तिसऱ्या सामन्यात देखील संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्नात असेल. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इतर सामन्यांच्या तुलनेत दबाव देखील अधिक असतो. अशात अफगाणिस्तानविरुद्ध जिंकल्यानंतर कर्णधार रोहितला पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याविषयी प्रश्न विचारला गेला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा संपूर्ण संघावर दबाव असला, तर रोहितच्या मते बाहेर चालणाऱ्या चर्चांकडे दुर्लक्ष करणे संघासाठी फायद्याचे ठरेल. “बाहेरच्या गोष्टींना जास्त महत्व न देणे, हेच महत्वाचे ठरेल. बाहेर काय सुरू आहे, त्याची आम्हाला काहीच काळजी नाही.” दरम्यान, रोहितच्या मते भारतीय संघ सध्या परिपूर्ण आहे. संघात विस्फोटक खेळी करणारे आणि दबावात संघाला सावरणारे असे दोन्ही प्रकारचे खेळाडू आहेत. “आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे निर्भीडपणे खेळू शकतात. सोबतच असेही खेळाडू आहेत, जे मागच्या सामन्यांप्रमाणे दबाव पेलू शकतात. संघात असे वेगवेगळे गुण असणं गरजेचं आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताला विजयासाठी 273 धावांचे लक्ष्य मिळाले. रोहितचे शतक आणि विराटच्या अर्धशतकामुळे भारताने ह लक्ष्य अवघ्या 35 षटकांमध्ये गाठले. विश्वचषकातील भारताचा हा सलग दुसरा विजय, तर अफगाणिस्तानचा सलग दुसरा पराभव ठरला. विश्वचषकाच्या गुणतालिकेत न्यूजीलंड सध्या दोन विजयांसह पहिल्या, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान सर्वात शेवटची दहाव्या क्रमांकावर आहे. (After defeating Afghanistan, Rohit Sharma made a statement about the match against Pakistan)
स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
महत्वाच्या बातम्या –
मिटल एकदाच! अखेर विराट-नवीनमध्ये दिल्लीत दिलजमाई, वादावर पडला पडदा
टीम इंडियाने राखले दिल्लीचे तख्त! हिटमॅनच्या हिटिंगच्या जोरावर नोंदवला वर्ल्डकपमधील सलग दुसरा विजय