क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भारतीय संघाने इंग्लंडला १५१ धावांच्या मोठ्या फरकाने नमवत मालिकेमध्ये १-० ने बढत मिळवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळी केली होती. त्यामुळे सामन्याचा निर्णय शेवटच्या दिवसापर्यंत स्पष्ट नव्हता. मात्र भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात कमालीची गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले.
सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३६४ धावा केल्या, तर इंग्लंड संघाने ३९१ धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला २७ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात थोडीशी डगमगली होती. मात्र, नंतर खालच्या फळीतील शमी-बुमराह यांच्या जोडीने कमालीची खेळी करत ९ व्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. त्यामुळे एक वेळ २०९ वर ८ विकेट असलेल्या भारतीय संघाने २९८ वर ८ विकेट असताना डाव घोषित केला. ज्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांनी चांगलीच नाचक्की करून टाकली होती. ज्यामुळे इंग्लंडचा संघ केवळ १२० धावांत गारद झाला आणि भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला.
या विजयानंतर याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला, “संपूर्ण संघावर मला अभिमान आहे. सुरुवातीच्या ३ दिवसात खेळपट्टीमधून जास्त काही मदत मिळाली नाही. पहिला दिवस आमच्यासाठी खूप कठीण दिवस होता. सुरुवातीला आम्ही दबावाखाली होतो. मात्र, नंतर दुसऱ्या डावात ज्याप्रकारे शमी-बुमराह यांनी भारतीय संघाचा डाव सावरला, ते खूप अप्रतिम होते. ज्यामुळे इंग्लंडला ६० षटकात बाद करू शकतो, असा आमच्यात विश्वास निर्माण झाला होता. दरम्यान, दोन्ही संघांमध्ये झालेल्या मौखिक वादाचा आम्हाला फायदा झाला.”
यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात ज्याप्रकारे भारताच्या खालच्या फळीतील खेळाडूंनी फलंदाजी केली. याला प्रभावित होऊन विराटने फलंदाजी प्रशिक्षकाचे देखील कौतुक केले. याबाबत तो म्हणाला, “फलंदाजी प्रशिक्षकाने खेळाडूंसोबत खरंच खूप चांगली मेहनत घेतली. शेवटच्या फळीत येऊन केलेल्या धावा या संघासाठी किती महत्वपूर्ण होत्या, हे आम्ही जाणून आहोत. मागील सामना आम्ही महेंद्रसिंग धोनी याच्या कर्णधारपदात २०१४ साली जिंकला होता. तो क्षण आमच्यासाठी खूप खास होता.”
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची होती. तेव्हा मोहम्मद सिराजबाबत कौतुक करत विराट म्हणाला, “लॉर्ड्स सारख्या मैदानात पहिल्यांदाच खेळत असताना देखील ज्या प्रकारे सिराजने गोलंदाजी केली. ती अत्यंत उत्कृष्ट दर्जाची होती. ज्यामुळे भारताचा हा विजय आणखीन महत्त्वपूर्ण बनतो. नवीन चेंडूचा पुरेपूर वापर करून भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली.”
दरम्यान, एक वेळ भारताचा दुसरा डाव डगमगला असताना शमी-बुमराह सारख्या तळातील फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत, संघाचा डाव चांगलाच सावरला. ज्यामध्ये दोघांनी मिळून ९ व्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. त्यामुळे त्यांनी इंग्लंड विरुद्ध ९ व्या विकेटसाठी खेळलेली दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली. तसेच १९८२ साली लॉर्ड्समध्ये कपिल देव आणि मदनलाल यांच्या भागीदारीचा विक्रम देखील शमी-बुमराहने मोडून काढला. विशेष म्हणजे या दोघांचीही आतापर्यंतची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.
डगमगलेल्या भारतीय संघाचा डाव सावरत शमी-बुमराहने आपल्या फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवून आणले. दोघांनीही इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजी विरुद्ध देखील एक से बढकर एक शॉट मारून क्रिकेटरसिकांना प्रभावित केले. कोहलीने देखील त्यांच्या या खेळाचे भरभरून कौतुक केले होते. शमीने तर एका पूर्णवेळ फलंदाजाचा प्रमाणेच मोईन अलीच्या गोलंदाजीवर ९२ मीटरचा षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. शमीच्या कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक होते.
ज्यामुळे दुसऱ्या डावात एकावेळी वरचढ असलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट दबावात आला. ज्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण खुले केले. याचा फायदा शमी-बुमराह यांनी उचलला आणि मिळेल तिथून १ व २ धावा चोरून घेत, भारतीय संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचे योगदान दिले.
सामना जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “भारतीय संघाचा हा विजय १५ ऑगस्टच्या एकदिवस नंतर मिळाला. मात्र, तमाम भारतीयांसाठी हेच आमच्याकडून १५ ऑगस्टची सर्वोत्तम भेट आहे जे आम्ही देऊ शकतो.”
महत्वाच्या बातम्या –
–तेंडुलकर, गांगुली ते अय्यर, गिल, आजी-माजी क्रिकेटर्सकडून ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव
–लॉर्ड्सवरील संस्मरणीय विजयानंतर विराटला झाली धोनीची आठवण, म्हणाला…
–जो रुटचे ‘ते’ तीन निर्णय, जे इंग्लंड संघाला लॉर्ड्स कसोटीत पडले महागात