आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप कमी असे फलंदाज आहेत, ज्यांना एकाच षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम करण्यात यश आले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी असा कारनामा केला आहे. परंतु वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्स हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने एकाच षटकात सलग ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. पण आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश झाला आहे.
भारतीय मुळचा खेळाडू जसकरण मल्होत्रा याने वनडे क्रिकेटमध्ये ६ चेंडूंमध्ये ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या जसकरण मल्होत्राने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध खेळताना ५० व्या षटकात हा ऐतिहासिक कारनामा केला.
त्याने या डावात १७३ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ४ चौकार आणि १६ गगनचुंबी षटकार लगावले होते. याचा अर्थ असा की, त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये ११२ धावा ठोकल्या.
मूळच्या पंजाबच्या असलेल्या जसकरण मल्होत्राचा हा ७ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यापूर्वी खेळलेल्या सामन्यांमध्ये १८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने वेगवान गोलंदाज गाउडी टोका याच्या षटकात सलग ६ षटकार ठोकण्याचा कारनामा केला. जसकरणने १२४ चेंडूंचा सामना करत नाबाद १७३ धावांची खेळी केली. यासह तो अमेरिका संघासाठी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
या दमदार खेळीच्या जोरावर अमेरिका संघाला पहिल्या डावात ९ बाद २७१ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पापुआ न्यू गिनी संघाला १३७ धावाच करता आल्या. त्यामुळे अमेरिकेने हा सामना १३४ धावांनी जिंकला.
https://twitter.com/usacricket/status/1436060985610100738
जसकरण मल्होत्राच्या पूर्वी वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्सने हा कारनामा केला होता. त्याने २००७ विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात असा कारनामा केला होता.
तसेच भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने देखील टी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. युवराज सिंगने २००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात हा कारनामा केला होता. तसेच याच वर्षी कायरन पोलार्डने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या टी -२० सामन्यात एकाच षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.
त्यामुळे जसकरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारा गिब्स, युवराज आणि पोलार्डनंतरचा चौथाच खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेला बुमराह अखेरच्या सामन्यात होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण
‘स्वप्न पूर्ण होतात!’ टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची भावूक पोस्ट
श्रेयस अय्यरला राखीव खेळांडूमध्ये ठेवून ईशान किशनला मुख्य संघात संधी देण्यामागे ‘हे’ आहे कारण