भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी एकूण 20 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे.
दरम्यान, नेपाळने टी20 वर्ल्ड कपसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. नेपाळने रोहित पौडेल याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे, तर दीपेंद्र सिंह ऐरी याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संघात संदीप लामिछाने याचाही समावेश करण्यात आला आहे.
नेपाळ क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या या 15 सदस्यीय संघात अनुभवी खेळाडू आणि युवा टॅलेंटचा योग्य मेळ घातला आहे. संघाची कमान 23 वर्षीय स्टार फलंदाज रोहित पौडेलच्या हाती आहे. रोहित एक अनुभवी फलंदाज असून त्याने आपल्या नेतृत्वाखाली नेपाळला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून दिले आहेत. तसेच, उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळालेला दीपेंद्र सिंह ऐरी आपल्या फलंदाजीसोबतच अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जातो.
संघाच्या फिरकी विभागाचे नेतृत्व अनुभवी संदीप लामिछाने करणार आहे. त्याच्यासोबतच फिरकीपटू ललित राजबंशी आणि बसीर अहमद यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत दीपेंद्रसह गुलशन झा, आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांचा समावेश करण्यात आला आहे.






