भारताच्या श्रीलंका दौरा संमिश्र स्वरुपाचा ठरला. वनडे मालिका भारताने जिंकली, पण टी20 मालिका भारताला गमवावी लागली. तसेच दौऱ्यातील अखेरचा सामना देखील भारताने गमावल्याने भारतासाठी या दौऱ्याचा शेवट पराभवाने झाला. खरंतर टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्याने मालिकाही गमवावी लागली. या दोन सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीबद्दल भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने जोरदार टीका केली आहे.
भारताच्या पराभवावर वीरेंद्र सेहवाग नाराज
श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघ फार चांगली कामगिरी करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ 81 धावा करू शकला आहे. प्रत्युत्तरासाठी दाखल यजमानांनी 82 धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि सामना जिंकत मालिका खिशात घातली.
त्यामुळे अनेकांनी भारतीय संघावर टीका केली. तसेच सेहवागला देखील या पराभवामुळे प्रचंड मोठा धक्का बसला आहे. सेहवागने असेही म्हटले की या पराभवानंतर त्याची मुले देखील त्याला खूप अपशब्द वापरत आहेत.
भारताच्या विकेट पडत होत्या, माझी मुले मला शिव्या देत होती
वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितले की “संपूर्ण सामना पाहणे कंटाळवाणे झाले. सामन्यात विकेट पडण्याशिवाय काहीच घडले नाही. माझी मुले मला शिव्या देत होती, तुमची टीम काय करत आहे ते पाहा. भारतीय संघाचा हा दिवस नव्हता.”
त्यापुढे ते म्हणाले की, “कधीकधी मालिकेमध्ये एक सामना येतो. जिथे तुम्ही पूर्णपणे कोसळता. मला वाटले की, एक नवीन खेळपट्टी आहे, भारतीय संघ 130-35 धावा करेल. मला वाटले नव्हते की, संघ 80 धावांवर बाद होईल.”
वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाच्या फलंदाजीवर आपला राग काढला आणि असे सांगितले की, “मला श्रीलंकेची गोलंदाजी इतकी खास वाटली नाही. 3 फलंदाजांनी पायचीत केले जे अत्यंत दुर्मिळ आहे. जर 5 पैकी 3 फलंदाज पायचीत झाले तर, ते कठिण तर होणारच.’
दरम्यान, “मला नितीश राणाला पाहून वाटले होते की, तो खेळला तर नक्कीच काहीतरी घडू शकते. जर एखाद्या फलंदाजाने 50-60 धावा केल्या. तर, संघ सन्माननीय धावसंख्या गाठू शकतो. मात्र, त्याने देखील संधी गमावली. यापेक्षा चांगली संधी कोणती? तुम्ही 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करा, अशी कोणीही अपेक्षा करत नाही. 50 बॉलमध्ये 50 धावा केल्या असत्या तरी संघाने सन्मानजनक धावसंख्या गाठली असती. मात्र, तसे काहीच झाले नाही.”
भारतीय संघ श्रीलंकेचा हा दौरा संपवून आता मायदेशी परतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ संघ होणार विजयी, इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे भाकीत
भारतीय संघातील ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंसाठी इंग्लंड दौरा ठरु शकतो अखेरचा