भारत आणि बंगालचा अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याने मंगळवारी (२ फेब्रुवारी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या जवळच्या दीड दशकांच्या कारकिर्दीचा शेवट झाला. त्याने पत्रकार परिषद घेत तो निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. डिंडा देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाज म्हणून नावाजले जाते.
मला वाटते की आता माझे शरीर मला पुढे खेळू देत नाही आहे त्यामुळे मी या क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे कारण देखील त्याने पत्रकार परिषदेत सांगितले.
सन २००५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. अशोक दिंडाने २०१० मध्ये झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. २०१३ साली तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांनतर त्याला पुन्हा भारतीय संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत तेरा एकदिवसीय सामन्यात १२ बळी घेतले. तर नऊ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १७ बळी घेतले आहेत.
बंगाल क्रिकेटची खूप काळ सेवा केल्यानंतर दिंडा गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला. बंगाल संघाचे प्रशिक्षक रणदीप बोस यांच्याशी झालेल्या वादामुळे त्याने गोव्याची वाट पकडली होती. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये त्याने गोव्याच्या संघाकडून सहभाग देखील नोंदविला होता.
आयपीएलमधील कामगिरी
डिंडाने आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकता नाइट रायडर्स, पुणे वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाचे प्रतिनिधित्व केलं. यात त्याने ७८ सामन्यात २२.२० सरासरीने ६८ विकेट घेतल्या.
बीसीसीआयचे आभार
बीसीसीआयचे आभार मानताना त्याने म्हटलं आहे की, ‘मी आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत आहे आणि गोवा क्रिकेट असोसिएशनला यासंदर्भात मी मेल देखील पाठवला आहे. भारताकडून खेळण्याचे सर्वांचे स्वप्न असते. मी बंगालकडून खेळलो आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. बीसीसीआयचे मनापासून धन्यवाद ज्यांनी मला भारताकडून खेळण्याची संधी दिली.’
सौरव गांगुलीचे मानले आभार
डिंडाने यावेळी त्याचा माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीचे आभार मानले. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली डिंडाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दादाने मला नेहमी पाठिंबा दिला मी त्याचा कायम ऋणी असेन अशी भावना त्यानी यावेळी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान सामन्यात खेळताना असे वाटते युद्ध लढायला चाललो आहोत, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे भाष्य
दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…