मुंबई । दोन आठवड्यांपूर्वी संपलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जबदस्त कामगिरी करून विजेतेपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत आशावादी आहेत.
महाराष्ट्राने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेतील सर्वात दिग्गज सेनादलचा पराभव करत विजेतेपद जिंकले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्राकडून कर्णधार रिशांक देवाडिगाने बाद फेरीत केलेली कामगिरी डोळ्यात भरणारी होती तर त्याला गिरीश इर्नाक आणि तुषार पाटीलने चांगली साथ दिली होती.
गोरगन, इराण येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करूनही महाराष्ट्राच्या खेळाडूंना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील कबड्डी चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
परंतु हैद्राबाद स्पर्धेत चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राच्या संघाने याचे चोख उत्तर दिले होते. यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल.
द एशियन एजशी बोलताना महाराष्ट्राचे प्रशिक्षक माणिक राठोड म्हणाले, ” महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांना आता याचे बक्षीस मिळायला हवे. “
यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे कौतुक केले तसेच या संघातील खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची आशा व्यक्त केली.
एशियन्स गेम्स २०१८ या जकार्ता, इंडोनेशिया येथे १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात होणार आहे. यात ५२ पैकी कबड्डी हाही एक मुख्य खेळ आहे.