इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. परंतु राजस्थान रॉयल्स संघाला २० षटकाअखेर अवघ्या १२१ धावा करण्यात यश आले होते. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतर फलंदाजांवर हा सामना जिंकवून देण्याची जबाबदारी होती. परंतु राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.
आता सामना झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने असे काही वक्तव्य केले आहे, ज्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, येणाऱ्या सामन्यात त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होऊ शकतात.
काय म्हणाला संजू?
या पराभवानंतर संजू सॅमसनने म्हटले की, “मला वाटते की हे असे आव्हान होते ज्याचा आम्ही यशस्वीरित्या पाठलाग करू शकत होतो. परंतु, आमचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. चेंडू संथ गतीने येणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे मुळीच सोपे नव्हते. मात्र, आम्ही जर खेळपट्टीवर जास्त वेळ घालवला असता तर, आम्ही आणखी धावा करू शकलो असतो. येणाऱ्या सामन्यात आम्ही जोरदार पुनरागमन करू. यापूर्वी आम्ही थोडा वेळ घेऊ आणि येणाऱ्या सामन्यासाठी संघात कुठला बदल करावा याचा विचार करू.”
दिल्ली गुणतालिकेत अव्वल
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत दिल्ली कॅपिटल्स संघाने पुन्हा एकदा १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने या स्पर्धेत एकूण १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ८ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे; तर, २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत ८ गुणांसह ७ व्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यांना इतर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दिल्लीचा प्लेऑफमध्ये प्रवेश
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकाअखेर ६ बाद १५४ धावा केल्या होत्या. यामध्ये श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर, हेटमायरने २८ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. कर्णधार संजू सॅमसनने एकहाती झुंज देत नाबाद ७० धावांची खेळी केली. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने राजस्थान रॉयल्स संघाला ६ बाद १२१ धावा करण्यात यश आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३३ धावांनी विजय मिळवला. यासह दिल्ली प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
युझी जिथे आनंदी आनंद तिथे; सामन्यानंतर चहलचा सीएसकेच्या गोटात फेरफटका, धोनीकडून धडेही घेतले






