नुकतेच माजी आयपीएल चेअरमन ललित मोदी यांनी श्रीसंतला हरभजन सिंगने मारलेला (Lalit Modi defends release of Harbhajan Singh slap video) नवा व्हिडिओ समोर आणून खळबळ उडवली होती. आता त्यांनी युवराज सिंगबद्दल नवीन खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कच्या पॉडकास्टमध्ये ललित मोदी यांनी 2007 टी-20 वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने लगावलेल्या सलग 6 षटकारांबद्दल खुलासा केला आणि त्यामागची गोष्ट सांगितली. मोदी यांनी Beyond23 या पॉडकास्टमध्ये क्लार्कशी बोलताना सांगितले, “2007 च्या टी20 वर्ल्डकपपूर्वी मी सगळ्यांना सांगितले होते की, जो कुणी एका षटकात 6 षटकार मारेल किंवा 6 विकेट घेईल, त्याला माझ्याकडून एक पोर्शे कार मिळेल.”
युवराजने शेवटी ही अट पूर्ण केली, जेव्हा भारताने 2007 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. ललित मोदींनी पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, “ही कामगिरी झाल्यानंतर युवराज धावत माझ्याकडे आला आणि पोर्शे कार देण्याचे वचन पूर्ण करण्याची मागणी केली.”
ललित मोदींनी पॉडकास्टमध्ये पुढे सांगितले, “युवराजने सीमारेषेजवळून माझ्याकडे पाहिले, त्याने बॅट उचलली आणि धावत माझ्याकडे आला व म्हणाला, ‘मला माझी पोर्शे हवी आहे.’ मी म्हणालो, ‘मला तुझा बॅट दे.’ ” युवराजने 2007 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ललित मोदींनी नंतर आपल्या वचनाप्रमाणे युवराज सिंगला पोर्शे कार गिफ्ट दिली होती. दुसरीकडे, युवराज सिंगने ज्याच्याने 6 षटकार लगावले होते तो बॅट आजही ललित मोदींच्या घरी 2007 वर्ल्डकपच्या त्या अविस्मरणीय क्षणाची निशाणी म्हणून ठेवलेला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकही झळकावले होते. ही कामगिरी त्याने केवळ 12 चेंडूत पूर्ण करत अनोखा पराक्रम केला होता.






