---Advertisement---

T20 WC: ऑस्ट्रेलिया पाठोपाठ न्यूझीलंडलाही झटका, दोन महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त

On: मंगळवार, जानेवारी 20, 2026 1:27 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वात फेब्रुवारीमध्ये पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेली असताना अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचे समोर येत असून काही त्यातून सावरतानाही दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स स्पर्धेच्या पहिल्या दोन-तीन सामन्यांना मुकणार आहे, असे त्यांचा संघनिवड अधिकारी जॉर्ज बेलीने सांगितले होते.

विश्वचषकाचा सराव व्हावा म्हणून संघ अधिकाधिक टी२० सामने खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे महत्वाचे खेळाडू टी२० मालिकांना मुकत आहेत. त्यातच न्यूझीलंडचे महत्वाचे दोन खेळाडू जखमी असल्याचे समजते. यामुळे दोन्ही संघाच्या अडचणीत भर पडली आहे.

न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने आणि अष्टपैलू मायकल ब्रेसवेल हे दुखापतग्रस्त आहेत. यामुळे हे दोघेही भारताविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. तसेच हे दोघे टी२० विश्वचषक संघाचाही भाग आहेत.

मिल्नेला एसए २० लीगमध्ये (दक्षिण आफ्रिका) दुखापत झाली होती, तर ब्रेसवेल भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत किरकोळ जखमी झाला होता. सध्या हे दोघेही त्यातून सावरत असून त्यांना भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ब्रेक दिला आहे.

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी मिल्नेच्या जागी क्रिस्टियन क्लार्कला संघात घेतले आहे. त्याने भारताविरुद्ध विजयी वनडे मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. यामुळे त्याला संधी दिली गेली, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सांगितले.

वॉल्टर पुढे म्हणाले, “मिल्ने आणि ब्रेसवेल दुखापतीतून सावरत आहेत. आमच्याकडे पर्यायी खेळाडू उपलब्ध आहेत. काही टी२० विश्वचषकाआधी संघाशी जोडले जाणार आहेत.”

भारत आणि श्रीलंका येथे खेळला जाणारा टी२० विश्वचषक २०२६, ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये न्यूझीलंडचा पहिला सामना ८ फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध चेन्नई येथे खेळला जाणार आहे.

टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ-

मिचेल सॅंटनर (कर्णधार), फिन ऍलन, मार्क चॅम्पमन, मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, डेवॉन कॉनवे, टीम सीफर्ट, जकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, इश सोधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---